कॉंग्रेसबरोबरच्या आघाडीची वाट न पाहता नव्या वर्षात वंचित बहुजन आघाडी लागणार लोकसभेच्या प्रचाराला

 कॉंग्रेसबरोबरच्या आघाडीची वाट न पाहता नव्या वर्षात  वंचित बहुजन आघाडी लागणार लोकसभेच्या प्रचाराला

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आता कॉंग्रेसशी आघाडी होण्याची वाट न पाहता नव्या वर्षात आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी राज्यातील बहुजन नेत्यांना सोबत घेऊन मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात संयुक्त सभा घेणार आहेत. 6 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान वंचित बहुजन आघाडी सोळा सभा घेणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र महासचिव अमित भुईगळ यांनी "सरकारनामा' शी बोलतांना ही माहिती दिली. 

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने राज्यातील राजकीय समीकरणच बदलून टाकले आहे. गेली कित्येक वर्ष दलित, मुस्लिम आणि वंचित बहुजनांच्या मतांवर सत्ता भोगणाऱ्यांनी केवळ या समाजाचा वापर करून घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यात आणि देशात वंचितांना सत्तेतील वाटा मिळावा यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजनांची मोट बांधल्याचे भुईगळ यांनी सांगितले. 

राज्यात अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभा सत्ताधाऱ्यांसह कॉंग्रेस-आघाडीच्या उरात धडकी भरवणाऱ्या ठरल्या. त्यानंतर आमच्या सोबत आघाडी करा यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने साद घातली खरी. पण नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांनी आम्हाला झुलवत ठेवण्याची जुनीच खेळी केली. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेच धादांत खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. चर्चा सुरू असल्याचे सांगतात. परंतु अशी कुठलीही चर्चा सुरू नसल्याचे स्वतः बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसवर विश्‍वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. म्हणून कॉंग्रेससोबतच्या आघाडीची वाट न पाहता नव्या वर्षापासून वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात करणार आहे. दीड महिन्यात ऍड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी हे तब्बल सोळा जाहीर सभा महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये घेणार असल्याचे भुईगळ यांनी सांगितले. 

मराठवाड्यात पाच सभा.. 
2 ऑक्‍टोबर रोजी औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडी-एमआयएमची संयुक्त जाहीर सभा जांबिदा मैदानावर झाली होती. लाखोंच्या संख्येने लोक या सभेला आल्यामुळे प्रस्थापितांना धडकी भरली होती. या रेकॉर्ड ब्रेक सभेनंतर 12 रोजी बीड, 17 ला नांदेड येथे सभा घेण्यात येणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 1 रोजी जालना, 4- लातूर आणि 5 फेब्रुवारीला हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीची सभा होईल. या शिवाय 6 जानेवारी- सांगली, 13-नाशिक, 16- यवतमाळ, 20-अमरावती, 22-चंद्रपूर, 25-सातारा, 27- कल्याण, तर 28 रोजी पिंपरी-चिंचवड. फेब्रुवारीमध्ये 7- गोंदिया, 12 कोल्हापूर आणि शेवटची 20 रोजी बुलडाणा येथे जाहीर सभा होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com