‘या’साठी खासदार राणांचा संताप झाला अनावर, अन् वनकर्मचाऱ्यांना फटकारले...

तुम्ही आज अशा वागत आहात, उद्या तुमच्यावर अशी परिस्थिती आली, तर आमच्यासारखे लोक तुमच्या मदतीला येणार नाही. एक महिला म्हणून तुम्ही कशा या निवेदनावर सह्या केल्या. त्या शिवकुमारला तर शिक्षा होईलच, पण रेड्डीसुद्धा वाचला नाही पाहिजे, ही मागणी तुम्ही केली पाहिजे. त्याला फाशी द्या, अशी मागणी तुम्ही करायला हवी.
Navnit Rana Angree on employees
Navnit Rana Angree on employees

अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेचीही मागणी जोर धरत आहे. अशा परिस्थितीत काही महिला वनकर्मचारी रेड्डी यांच्या समर्थनार्थ निवेदन घेऊन खासदार नवनीत राणा यांच्या घरी गेल्या. त्यांना खासदार राणा यांनी चांगलीच फटकार लगावली. 

घरी निवेदन द्यायला आलेल्या महिला वनकर्मचाऱ्यांना खासदार राणा म्हणाल्या, रेड्डीसारख्या बदमाश माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही आल्या आहात, निवेदनही आणले आहे. पण मी तुमचे हे निवेदन स्वीकारणार नाही. काय तुम्ही महिला आहात? त्या रेड्डीने दुर्लक्ष केल्यामुळे दीपालीला आत्महत्या करावी लागली. त्याला मी १० फोन केले, आमदार रवी राणा यांनीसुद्धा फोन केले आणि दीपाली यांना त्रस्त करणाऱ्या विनोद शिवकुमारवर कारवाई करण्यासाठी वारंवार सांगितले. पण त्यानं एक नाही ऐकली आणि दीपालीला जीव गमवावा लागला. तुम्हीसुद्धा महिला आहात, त्याच विभागात काम करीत आहात. हा अधिकारी आज आहे, उद्या दुसऱ्या जिल्ह्यात निघून जाईल. तुम्ही का म्हणून त्याला मदत मिळवून देण्यासाठी येथे आल्या आहात. एका महिलेला न्याय मिळवून देण्याच्या बाजूने राहण्याऐवजी त्या अत्याचाऱ्याच्या बाजूने उभे राहताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?

तुम्ही आज अशा वागत आहात, उद्या तुमच्यावर अशी परिस्थिती आली, तर आमच्यासारखे लोक तुमच्या मदतीला येणार नाही. एक महिला म्हणून तुम्ही कशा या निवेदनावर सह्या केल्या. त्या शिवकुमारला तर शिक्षा होईलच, पण रेड्डीसुद्धा वाचला नाही पाहिजे, ही मागणी तुम्ही केली पाहिजे. त्याला फाशी द्या, अशी मागणी तुम्ही करायला हवी. तर तुम्ही हे भलतच काय घेऊन आल्या. पालकमंत्र्यांनीही त्या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती. तरीही रेड्डींनी शिवकुमारची चौकशी केली नाही. दीपाली रडूनपडून त्यांना वारंवार सांगत राहिल्या. पण रेड्डीला पाझर फुटला नाही. त्यामुळेच शेवटी दीपाली यांनी आत्महत्या केली. अशा महिलेबद्दल तुम्हाला काही वाटत नसेल, तर तुम्ही आपले निवेदन उचला आणि निघा येथून, असे महिलांना म्हणताना खासदार राणा यांचा संताप चांगलाच अनावर झाला होता.  

दीपाली यांनी विनोद शिवकुमार या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. या प्रकरणी तीव्र संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात उमटत असून मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मात्र मेळघाटातील महिला वनकर्मचारी व अधिकारी हे मात्र चक्क श्रीनिवास रेड्डी यांच्या समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. श्रीनिवास रेड्डी व दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या विनोद शिवकुमार यांना कठोर शिक्षा होईल, असे नवनीत राणा यांनी यावेळी ठणकावून सांगितले. त्यांच्या समर्थनार्थ निवेदन घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चक्क हाकलून लावले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com