विकासकामाबाबत भाजपचे चर्चेचे आव्हान कॉंग्रेसने स्वीकारावे : सुधीर मुनगंटीवार 

विकासकामाबाबत भाजपचे चर्चेचे आव्हान कॉंग्रेसने स्वीकारावे : सुधीर मुनगंटीवार 

हिंगोली : भाजप शिवसेनेला शेतकरीविरोधी म्हणणाऱ्या कॉंग्रेसने राष्ट्रवादी आघाडीने मागील पंधरा वर्षात केलेली कामे व युती सरकारने मागील पाच वर्षात केलेली कामे यावर चर्चा करायला तयार व्हावे असे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी विरोधकांना दिले. हिंगोली येथील कोषागार कार्यालयाच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. 

भाजप-सेना युतीला शेतकरीविरोधी म्हणून बोलले जात आहे. तर कॉंग्रेसराष्ट्रवादी कडूनही असा आरोप केला जात आहे. मात्र मागील पंधरा वर्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी कोणती कामे केली याची माहिती त्यांनी द्यावी. नैसर्गिक आपत्तीमधे पिकांचे नुकसान झाल्यानंतर 50 टक्के नुकसानीनंतरच भरपाई देण्याचा कॉंग्रेसचा निर्णय बदलून 33 टक्के नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदतही केली आहे. राज्यात शेती उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प सुरू केले, तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेमध्ये अनुदानही वाढवले आहे. मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादीची एकही योजना सरकारच्या हिताची नव्हती असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

आघाडी सरकारने मागील पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केलेला निधी व युती सरकारने पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केलेल्या निधी याचे आकडे तपासल्यानंतर कोणते सरकार शेतकरीविरोधी होते हे लक्षात येईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत विकास कामांचा निधी व खर्चाच्या आकड्याबाबत चर्चा करायला आपण कधीही तयार आहोत. कॉंग्रेसवाल्यांनी आपले आव्हान स्वीकारावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या नोबेल पुरस्कार दिला जातो. मात्र खोटे बोलणाऱ्यांना डोबेल पुरस्कार द्यावा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. 

युतीच्या काळामध्ये सर्वात जास्त जातीय दंगली घडल्या असे म्हणणाऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळातील दंगलींचा आकडा व युती सरकारच्या काळातील दंगलींचा आकडा तपासून पाहावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून सत्तेवर येता येत नाही तर त्यासाठी विकास कामे करावी लागतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना-भाजपाची युती होणारच आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com