ऍनेमियाचा उपचार सोडून केली कोरोनाची टेस्ट, मग सुरु झाला मृतदेहाचा अंत्यसंस्कारासाठी प्रवास

यवतमाळ जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने ग्रामीण व शहरी जनतेत भीतीचे वातावरण आहे. केळापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. देशी व विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेक तळीराम गावठी दारूकडे वळले. अशातच तालुक्‍यातील अंभोरा येथील सुभाष 'एकच प्याला'च्या शोधात झंझारपूर येथे पोचला. तेथे अवैधरीत्या गाळण्यात आलेली दारू जास्त प्रमाणात प्यायला.
One Patient in Yavatmal Died to to Wrong Test
One Patient in Yavatmal Died to to Wrong Test

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : तालुक्‍याच्या अंभोरा गावातील तरुण सुभाषला (नाव बदललेले) अतिमद्यप्राशनामुळे यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. तो क्रिटिकल ऍनेमिया रुग्ण होता. पण तेथे मुळ रोगावर उपचार करण्याचे सोडून कोरोनाच्या धामधुमीत त्याचीही कोरोना चाचणी केली. पण अहवाल येण्यापूर्वी त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

अहवाल आल्याशिवाय मृतदेहाचा अंत्यसंस्कार करायचा नाही, असे डॉक्‍टरांनी ठरवले. तोपर्यंत सुभाषचा मृतदेह कोरोनाबाधितांच्या मृतदेहांसोबत ठेवण्यात आला. दरम्यान अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालय प्रशासनाने अंतिम संस्कार करण्यास परवानगी दिली. पण तोपर्यंत तो कोरोनाबाधित असल्याची अफवा त्याच्या गावाच्या पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे गावकऱ्यांनी मृतदेह गावात आणण्यास मज्जाव केला. अखेर सहा दिवसांनंतर काल दुपारी यवतमाळात धर्मावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्‍टरांची चूक आणि त्यानंतर उडालेल्या अफवा, यांमुळे सुभाषच्या मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी सहा दिवस लोटावे लागले. 

यवतमाळ जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने ग्रामीण व शहरी जनतेत भीतीचे वातावरण आहे. केळापूर तालुकादेखील त्याला अपवाद नाही. देशी व विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेक तळीराम गावठी दारूकडे वळले. अशातच तालुक्‍यातील अंभोरा येथील सुभाष "एकच प्याला'च्या शोधात झंझारपूर येथे पोचला. तेथे अवैधरीत्या गाळण्यात आलेली दारू जास्त प्रमाणात प्यायला. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळच्या कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्याचा मद्यप्राशनाचा इतिहास न विचारता थेट कोरोनाचे सॅंम्पल घेण्याचे आदेश दिले. रिपोर्ट येईपर्यंत त्याला विलगीकरण कक्षात ठेवले. मात्र, सुभाषचा त्याच दिवशी उपचाराविना मृत्यू झाला. 

दरम्यान कोरोनाचा रिपोर्ट आल्याशिवाय त्याचा मृतदेह कुटुंबाला देता येणार नाही, असे त्याच्या वडिलांना रुग्णालय प्रशासनाने कळविले. मुलाचा मृतदेह आणण्यासाठी दोनवेळा वडील पंधराशे रुपयाचा ऑटो करून यवतमाळला गेले. मृतदेह आपल्याकडे सोपविण्यात यावा, अशी विनंती केली. मात्र, रुग्णालय प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. विलगीकरण कक्षात त्याने अखेरचा श्‍वास घेतला. त्यामुळे मृतदेह गावी आणू द्यायचा नाही, असा निर्णय सरपंच, पोलिस पाटील आणि गावकऱ्यांनी घेतला. सुभाषच्या वडिलांनीही मग मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सरकारनेच काय ते करावे, असे पत्र तहसीलदारांना दिले होते. 

ग्रामस्थांची आरोग्य तपासणी 

सुभाषचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाला. मात्र, तो कोरोनाबाधित नसतानाही त्याला कोरोना झाला होता, अशी अफवा गावात पसरली. तो कुणाकुणाच्या संपर्कात आला. याची चौकशी करण्यात आली आणि त्याच्या गावातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

अखेर यवतमाळमध्ये अंत्यसंस्कार 

मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यात अडचण निर्माण झाल्याने त्याच्या नातेवाइकांनी यवतमाळ गाठले. पत्नी, साळा, वडिल यांच्या उपस्थितीत काल दुपारी यवतमाळ येथे सुभाषच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्याचा साळा विठोबा पेंदोर यांनी दिली. 

सुभाष क्रिटिकल ऍनेमिया रुग्ण असल्याचे आढळल्याने त्याला पुढील उपचाराकरिता यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. - डॉ. तोडासे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com