सोलापुरातील पद्मशाली मेळाव्यात एकी दिसणार, की बेकी?

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी सोलापूर शहर मध्य व उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पद्मशाली समाज एकवटण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा समाजाच्या उमेदवाराला आमदार करण्याचा चंग समाजबांधवांनी बांधल्याचे चर्चेत आहे.
सोलापुरातील पद्मशाली मेळाव्यात एकी दिसणार, की बेकी?

सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी सोलापूर शहर मध्य व उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पद्मशाली समाज एकवटण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा समाजाच्या उमेदवाराला आमदार करण्याचा चंग समाजबांधवांनी बांधल्याचे चर्चेत आहे.

येत्या 22 सप्टेंबरला महामेळावा घेऊन समाजबांधवांची मोट बांधण्याचा समाजधुरिणींचा प्रयत्न सुरू आहे. विविध पक्षांकडून पद्मशाली समाजाला अनेक पदांपासून व निवडणुकांपासून वंचित ठेवले जात असल्याचे शल्य पद्मशाली समाजबांधवांमध्ये आहे. 

मध्यंतरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत श्री मार्कंडेय मंदिरात बैठक घेऊन रोष व्यक्त केला.  समाजातील अनेक प्रश्‍नांकडे काणाडोळा होत असून, भाजपकडून पद्मशाली समाजावर अन्याय होत असल्याने अनेक नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. यानंतर विधानसभेत यंदा पद्मशाली समाजाचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार करून त्या दिशेने प्रयत्न सुरू होते. 

आता पश्‍चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अधिवेशन भरवून समाजाची एकी व ताकद दाखवून देऊन, उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना, मात्र सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याला विधानसभेत पाठवण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे. यासाठी समाजातीलच एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. 

काही विरोधक हा निर्धार यशस्वी करण्यासाठी एकत्रही आले आहेत. तर काही विरोधकांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांना शनिवारी झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाच्या अधिवेशनानिमित्त संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाला आमंत्रण दिले नसल्याने धुसफूस सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे मेळाव्यात एकी दिसून येईल की बेकी, हे ही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

प्रत्येक पक्षाचे तिकीट वाटपाचे धोरण काय आहे, समाजाला कुठल्या पक्षाने न्याय देण्याचा प्रयत्न केला, याचा अभ्यास करून समाजातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज समाजामार्फत मागवण्यात येणार आहेत. त्यातील सक्षम उमेदवाराला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

मात्र "सक्षम'ची नेमकी व्याख्या काय असणार आहे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पद्मशाली समाजाच्या "वन मॅन आर्मी'ची भूमिका काय असणार आहे, उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या नेत्यांना "सक्षम'चा फॉर्म्युला रुचेल का, त्यांची ऐनवेळी भूमिका काय राहणार आहे, हे येत्या थोड्या दिवसांत दिसून येईल. नेमके काय, समाजाला एकवटण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या नेत्याची मेहनत फळाला आणण्याची जबाबदारी समाजातील नेत्यांची व समाजबांधवांची आहे, मात्र त्यात स्वार्थ साधणाऱ्यांची चांदी होणार नाही, याची दक्षता आयोजकांना घ्यावी लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com