पनवेलात प्रभावशाली पक्षांपुढे मित्र पक्षांची फरफटच !

पनवेलात प्रभावशाली पक्षांपुढे  मित्र पक्षांची फरफटच !

मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या वाहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार अभियानाने वेग पकडला असला तरी आघाडी, युतीवर नजर टाकली असता, प्रभावशाली पक्षांपुढे मित्र पक्षांची फरफट होत असल्याचे दिसून येत आहे. रिपाइं व कॉंग्रेस पक्षामध्ये याविषयी नाराजीचा सूर आळविला जात आहे. 

पनवेल महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा युती नसल्याने शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. भाजपा आणि आठवले गटाची रिपाइं एकत्रित निवडणूक लढवीत आहे. शेकापने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेची मोट बांधून महाआघाडी बनविली आहे. एमआयएम,आगरी सेना, बच्चू कडूंचा प्रहार, आगरी सेना, संभाजी ब्रिगेडची तिसरी आघाडीदेखील भाजपा व शेकापकरिता डोकेदुखी बनू लागली आहे. 

निवडणुकीकरिता युती वा आघाडी इतपत ठीक असले तरी मित्रपक्षाच्या उमेदवारांनाच आपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले गेल्यामुळे पनवेलमध्ये प्रभावशाली पक्षांपुढे मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची फरफट होऊ लागली आहे. भाजपा-रिपाइं युती असली तरी रिपाइंचे मातब्बर नेते जगदीश गायकवाड भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीतही आरपीआयचे उमेदवार भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढले होते. त्यावेळी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला होता. तोच निकष पनवेल महापालिका निवडणुकीत जगदीश गायकवाड यांना लावून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

शेकापसोबत कॉंग्रेस असली तरी कॉंग्रेसच्या तिकिटावर शेकापने काही जागांवर आपल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याने पनवेलमध्ये कॉंग्रेस पक्ष शेकापच्या दावणीला बांधला आहे काय, असा संतप्त प्रश्‍न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. 
पनवेल महापालिकेकरता खरी लढत शेकाप व भाजपातच असून बहूमताकरिता काही जागा कमी पडल्या तरच मित्र पक्षांना तसेच तिसऱ्या आडातील नगरसेवक निवडून आणलेल्या पक्षांना महत्त्व प्राप्त होणार आहे. सत्ता आली तर सत्तेचा सहवास तरी मिळेल या एकमेव आशेपायी मित्र पक्ष आपली फरफट सहन करत असल्याचे पनवेलमध्ये प्रचारादरम्यान पहावयास मिळत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com