रवींद्र मिर्लेकर यांचे शिवसेनेत वजन वाढले

रवींद्र मिर्लेकर यांचे शिवसेनेत वजन वाढले

मुंबईच्या निवड समितीत स्थान, देसाईंवर ग्रामीण भागाची जबाबदारी 

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सेना भाजपच्या युतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी शिवसेनेने नेमलेल्या समितीत शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेच्या थिंकटॅंकमधील विश्‍वासू नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मुंबईबाहेरील ग्रामीण भागातील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. 


मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनाही स्वबळावर निवडणूक लढवावी असे वाटत आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बोलणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सेनेकडून शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार ऍड. अनिल परब आणि उपनेते माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांची तर भाजपकडून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची समिती तयार करण्यात आलेली आहे. सोमवारी मंत्रालयाजवळील एका ठिकाणी झालेल्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे दोन मंत्री समितीत असताना, शिवसेनेचा एकही मंत्री सध्या युतीच्या जागावाटप चर्चेत नाही. कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, राज्यमंत्री रवींद्र वायकर हे सेनेचे मंत्री मुंबईकर आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम हे फटकळपणे आपली भूमिका मांडत असल्याने त्यांना याआधी राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष द्यायला सांगितले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे सेनेच्यावतीने तयार करण्यात समितीत नाव होते. परंतु,ऐनवेळी सुभाष देसाई यांच्याऐवजी सेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या नावाचा सोमवारी समावेश करण्यात आला आहे. 


मूळचे गिरगांवकर असलेले रवींद्र मिर्लेकर यांना निवडणूक प्रक्रियेचा चांगला अभ्यास असलेला नेता म्हणून पक्षांत ओळखले जाते. शिवसेनेचे अभ्यासू ज्येष्ठ नेते आणि बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील एक सदस्य दिवंगत प्रमोद नवलकर यांच्या तालीमात शिकलेल्या रवींद्र मिर्लेकर यांना सेनेकडून यापूर्वी विधान परिषदेवर पाठविण्यात आले होते. निवडणूक काळात उमेदवारांचे खर्च तपशील, मुंबई महापालिकेतील सर्व प्रभागांची माहिती मिर्लेकर यांना असल्याने त्यांना या समितीत सहभागी करून घेतल्याचे बोलले जाते. जालना, परभणी आदी मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी मिर्लेकर यांच्याकडे होती. त्यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणापासून ते काही काळ लांब होते. मुंबईतील सेनेच्या समितीत मिर्लेकर यांची निवड करण्यात आल्याने पुन्हा एकदा ते मुंबईतील पक्षाच्या कामात सक्रिय होणार आहे. 


सेनेच्या या समितीत असलेले अनिल देसाई हेही गिरगांवकर आहेत. तर वांद्रयांच्या मातोश्री बंगला असलेल्या खेरवाडी परिसराचे विभागप्रमुख अनिल परब हे दोघेही उद्धव ठाकरे यांच्या गुड बुकमधील असल्याचे बोलले जाते. मुंबईमध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी असताना, मिर्लेकर यांची वर्णी लागल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढल्याची सेनेच्या वर्तुळात चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com