बनावट प्रमाणपत्रावर लाटल्या नोकऱ्या, सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालकाला अटक !

अनेक बोगस खेळाडूंनी पाच टक्के आरक्षणात नोकरी मिळविण्यासाठी हा फंडा अवलंबून शासकीय नोकऱ्या लाटल्या. या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.
Subhash Rewatkar - Mahesh Padole
Subhash Rewatkar - Mahesh Padole

नागपूर : स्वतः खेळाडू नसताना बनावट क्रीडा प्रमाणपत्राचा वापर करून अनेकांनी नोकऱ्या लाटल्या. त्यामुळे खरे खेळाडू नोकरीपासून वंचित राहिले. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून अनेक बोगस खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. पण या प्रकाराला जबाबदार असलेले सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि सध्या भंडारा येथे कार्यरत असलेले क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना मानकापूर पोलिसांना अटक केली. आज या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

सध्या राज्यभर गाजत असलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी काल सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात कोल्हापूर विभागातही अधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती आहे. बोगस खेळाडूंनी बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून आतापर्यंत राज्यातील विविध विभागांमध्ये अनेक बोगस खेळाडूंवर कारवाई करण्यात आली. नागपुरातही उपशिक्षणाधिकाऱ्यांसह दोघांना अटक झाली. मात्र या गैरप्रकाराला मुख्यत्वे कारणीभूत ठरलेले वरिष्ठ अधिकारी अजूनही मोकळे फिरत होते. आज पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करताना सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि सध्या भंडारा येथे कार्यरत असलेले क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक केली. रेवतकर यांना त्यांच्या बंधूनगर येथील घरून अटक केली, तर पडोळे यांना पोलिसांनी पत्र देऊन ठाण्यात बोलावून घेतले, अशी माहिती मानकापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी दिली. 

उल्लेखनीय म्हणजे रेवतकर यांच्याच कार्यकाळात हा घोटाळा झालेला आहे. त्यांनी प्रमाणपत्रांची पडताळणी न करता पदाचा दुरुपयोग करून या प्रकाराला एकप्रकारे खतपाणीच घातले. रेवतकर हे काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, सविस्तर चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. पोलिस चौकशीत आणखी काही नावे किंवा मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला उपशिक्षणाधिकारी रवींद्र आबासाहेब सावंत (रा. कामेरी, जि. सांगली) याच्या पोलिस कोठडीत येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दैनिक 'सकाळ' ने सर्वप्रथम नऊ सप्टेंबरच्या अंकात ''बनावट क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकऱ्या लाटल्या'' अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून हा गैरप्रकार उघडकीस आणला होता. भविष्यात असे गैरप्रकार होऊ नये, म्हणून शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून यापुढील सर्व राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निरीक्षकांच्या नियुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे स्पर्धांमध्ये पारदर्शकता येऊन, बनावट प्रमाणपत्र व बोगस खेळाडूंना आळा बसणार आहे. अनेक बोगस खेळाडूंनी पाच टक्के आरक्षणात नोकरी मिळविण्यासाठी हा फंडा अवलंबून शासकीय नोकऱ्या लाटल्या. या सर्वांचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय कार्यालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व बोगस खेळाडू ट्रॅंपोलिन व टंबलिंग या क्रीडा प्रकारातील आहेत. या प्रकरणात आणखी २२ बोगस खेळाडू पोलिसांच्या रडारवर आहेत. 

(Edited By : Atul Mehere)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com