विजनवासातील राजकीय नेत्यांची अवस्था वाईट : शरद पवार

 विजनवासातील राजकीय नेत्यांची अवस्था वाईट : शरद पवार

मावळ : देशासाठी योगदान दिलेल्या व नंतर विजनवासात गेलेल्या जॉर्ज फर्नांडिस, जसवंत सिंग आणि अटलबिहारी -वाजपेयींसारख्या राजकीय नेत्यांची शेवटच्या काळात झालेली अवस्था पाहून अतिशय वाईट वाटते, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी तळेगाव दाभाडे (जि.पुणे) येथे आज व्यक्त केली. दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या अर्धाकृती पुतळयाचे अनावरण केल्यानंतर पवार बोलत होते. 

मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन आणि मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील राम मनोहर लोहीया समाजवादी विद्यापीठाच्या आवारात राव यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी हा पुतळा उभारण्यात आला आहे. असोसिएशनचे सरचिटणीस ऍड. महाबळ शेट्टी अध्यक्षस्थानी होते. असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.सुखदेव काशिद, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी खासदार विदुरा नवले, माजी मंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी व्यासपीठावर होते. 

सत्तेत असलो नसलो तरी कामगारांच्या प्रश्नावर साथ देण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. अठरा राज्यातील लाखो कामगार पाठीशी असलेले शरद राव हे देशातील एकमेव कामगार नेते होते, असे ते म्हणाले. राव यांच्या आठवणीने अस्वस्थ झाल्याचे त्यांनी सांगितले. बाबरी मशिद पाडल्यानंतर झालेल्या दंगलीनंतर बंद पडलेली देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा चालू करण्याकामी शरद राव यांची मदत घेतल्याची आठवण पवार यांनी सांगितली. 

गेल्या सहा वर्षापेक्षा अधिक काळापासून बेशुध्दावस्थेत असलेल्या फर्नांडिस यांच्यासह जसवंत सिंग यांच्याकडेही पाहण्यासाठी आता कुणाला वेळ नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, शरद राव, जॉर्ज फर्नांडिस यांनी शेतकरी-कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी मोठमोठी आंदोलने केली मात्र मागण्या मान्य करुन घेण्याचे कसब आणि आंदोलन थांबवायचे कुठे याची जाणीव त्यांना होती. दुर्दैवाने आजच्या नेत्यांना आंदोलन थांबवायचे कुठे ? हे कळत नाही. कामगारांचे हित पाहून चळवळीला विधायक विचार देण्याचे काम करण्यासाठी देशातील एकमेव विद्यापीठाची उभारणी राव आणि ऍड.महाबळ शेट्टी यांनी तळेगाव दाभाडे येथे केली. 

असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.सुखदेव काशिद,कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे,माजी आमदार कृष्णराव भेगडे,माजी खासदार विदुरा नवले,माजी मंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे,नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी व्यासपीठावर होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com