तलावाच्या जलपूजनावरून शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर

आज सकाळीच अंबादास दानवे आपल्या समर्थकांना घेऊन हर्सुल तलावावर पोहचले आणि त्यांनी जलपुजन केले. ते जलपूजन करून परत नाही तोच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले व इतर शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने हर्सुल तलावावर पोहचले. अंबादास दानवे जलपूजन करून गेल्याचे कळाल्यानंतर खैरे यांनी मग उत्तर पूजन करत मधला मार्ग काढला.
khaire-danve contervercy news aurangabad
khaire-danve contervercy news aurangabad

औरंगाबाद ः जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असले तरी पावसाच्या हजेरीने औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला, तर कुठे अतिवृष्टी, यामुळे मात्र नदी, नाले, ओढे व छोटी धरण तुंडुब भरली आहेत. जुन्या औरंगाबाद शहराची तहान भागवणारा हर्सुलचा तलाव सध्या पुर्णपणे भरला आहे. या तलावाच्या जलपूजनावरून मात्र शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व विधान परिषदेतील आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद जिल्ह्याला नवा नाही. हर्सुल तलावाच्या जलपूजनाच्या निमित्ताने या दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. एकाच दिवशी एकाने जलपूजन तर दुसऱ्यांने उत्तर पूजा करत एकमेकांवर कुरघोडी केली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांचा पक्ष व स्थानिक राजकारणातील प्रभाव कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते. तर दुसरीकडे आपले अजूनही मातोश्रीवर पुर्वी इतकचे वजन असल्याचे खैरेंकडून वारंवार सांगितले जाते.

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्यासोबतच अंबादास दानवे यांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. पण विजयातील सातत्य पाहता पाचव्यांदा उमेदवारीची माळ खैरे यांच्या गळ्यात येऊन पडली. त्यामुळे या दोघांमध्ये असलेला वाद उमेदवारीवर दावा सांगितल्यानंतर अधिकच वाढला. जिल्ह्यातील या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वादात पदाधिकारी आणि शिवसैनिक मात्र नाहक भरडे गेले आणि जात आहेत.

जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे हर्सुलचा तलाव पुर्णपणे भरला आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओरड काहीसी कमी होण्यास मदत होणार आहे. शहराला पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी जुन्या औरंगाबाद शहराला अजूनही हर्सुल तलावातून पाणी पुरवठा केला जातो. शहरासाठी हर्सुल तलावाचे महत्व लक्षात घेता जलपूजन करण्याचा कार्यक्रम आमदार अंबादास दानवे यांनी निश्चित केला होता.

त्यानूसार आज सकाळीच अंबादास दानवे आपल्या समर्थकांना घेऊन हर्सुल तलावावर पोहचले आणि त्यांनी जलपुजन केले. ते जलपूजन करून परत नाही तोच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले व इतर शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने हर्सुल तलावावर पोहचले. अंबादास दानवे जलपूजन करून गेल्याचे कळाल्यानंतर खैरे यांनी मग उत्तर पूजन करत मधला मार्ग काढला. निसर्गाच्या कृपेने तुडुंब भरलेल्या हर्सुल तलावाच्या जलपूजनात देखील शिवसेनेच्या या दोन नेत्यांकडून कुरघोडीचे राजकारण झाल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

कोरोनाच्या संकटातही एकला चलो रे..

जिल्ह्यातील कोरोनाच्या संकटात देखील एकाच पक्षातील या दोन नेत्यांच्या मार्ग एकला चलो रे असाच होता. गोरगरीब व गरजूंना अन्नधान्य, किराणा सामानाचे कीट व इतर साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात देखील या दोघांमधील दुरावा दिसून आला. काही दिवसांपुर्वी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधातील आंदोलनात खैरे-दानवे एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा सुरू होत नाही तोच, हर्सुल तलावाच्या जलपूजन कार्यक्रमाने ही अपेक्षा फोल ठरवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com