शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचा विखे पाटील यांचा डाव 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून पेरणीबंद संपाचा बार फुसका ठरू पाहत आहे. आंदोलनाच्या मुख्य प्रवर्तकांमध्ये फूट पडली आहे. आंदोलनात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप दोघांनी केला, तर मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक चर्चेमुळे आंदोलन स्थगित केल्याचे एकाने जाहीर केले
radha-krushna-vikhe
radha-krushna-vikhe

नगर:   विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच हे आंदोलन हाणून पाडल्याची टीका या आंदोलनाचे नेते धनंजय जाधव व धनंजय धोर्डे यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला आहे. 

पुणतांबे (ता. कोपरगाव) येऊन प्रथम सुरू झालेले हे आंदोलन मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आल्याचे डॉ. धनंजय धनवटे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर यात राजकीय हस्तक्षेप झाला असून, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे धनंजय जाधव व धनंजय धोर्डे यांनी जाहीर केले. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक जूनपासून पेरणीबंद संपाचा बार फुसका ठरू पाहत आहे. आंदोलनाच्या मुख्य प्रवर्तकांमध्ये फूट पडली आहे. आंदोलनात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप दोघांनी केला, तर मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक चर्चेमुळे आंदोलन स्थगित केल्याचे एकाने जाहीर केले.आगामी काळात हे आंदोलन किती दिवस टिकेल, हा प्रश्‍न आहे.

तीन धनंजयमध्ये पाडली फूट 

एक जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारावा, यासाठी धनंजय जाधव, धनंजय धोर्डे व डॉ. धनंजय धनवटे हे तीन धनंजय एकत्र आले. पुणतांब्याच्या ग्रामसभेत या संपाची हाक दिली. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ठराव करून संपास पाठिंबा दिला. राज्यातील शेतकऱ्यांचे या संपाकडे व सरकारच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे. डॉ. धनवटे हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ते. आंदोलनाचे नेतृत्त्व त्यांनी केले. आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे इतर दोघे जाधव व धोर्डे हे राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत. तिघांमध्ये फूट पडल्याने शेतकऱ्यांनी कोणाचे नेतृत्त्व स्विकारायचे, हा प्रश्न आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे: धनवटे 

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्‍वासने दिली आहेत. त्यामुळे संप करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे संप स्थगित करीत आहोत. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणे अपेक्षित असताना काही कार्यकर्त्यांनी संघटनेच्या माध्यमातून भाजीपाला फेकणे, नुकसान करणे असे धोरण अवलंबिले. ते चुकीचे आहे. हे आंदोलन केवळ शेतकरीच करणार असल्याचे ठरले असताना काही मंडळींनी शेतकरी संघटनांना मध्ये घेतले, असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले. 

हा संप मोडण्याचा विखे पाटील यांचा डाव: जाधव 

शेतकऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे. आश्‍वासने नको, प्रत्यक्ष मागण्या मान्य झाल्या पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची संप मोडण्याची ही सेटींग आहे. विखे यांच्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे. या संघर्ष यात्रेच्या यशस्वीतेसाठी विखे यांनी हा संप मोडीत काढण्याचा डाव आखला आहे. असे असले, तरी संप सुरू ठेवण्यासाठी औरंगाबाद, मुंबईला बैठका सुरू आहेत. संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे केले तर आंदोलकांची ताकद आणखी वाढेल, असे किसान क्रांती राज्य कृतिसमितीचे सदस्य धनंजय जाधव यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांकडून राजकारण: धोर्डे 

मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते समन्वयाने या प्रश्‍नावर मार्ग काढत असतील, तर संघर्ष यात्रा किंवा संवाद यात्रेची गरजच काय. मुख्यमंत्र्यांचे केवळ आश्‍वासन आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे, असे प्रगतशील शेतकरी धनंजय धोर्डे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com