विनायक राऊत यांचा दणदणीत विजय समीकरणे बदलविणारा

विनायक राऊत यांचा दणदणीत विजय समीकरणे बदलविणारा

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विनायक राऊत यांचा दणदणीत विजय जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे. शिवसेना तळागाळात कशी पोचली आहे,याचा पडताळा या निकालाने दिला. स्थानिक राजकारणावरील शिवसेनेची पकड आणि मजबूत संघटन यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तीनही मतदारसंघांत काय होणार, असा प्रश्‍नच विचारण्याचे कारण नाही, इतका हा सुस्पष्ट निकाल आहे. भाजपला यापुढे जिल्ह्यात दुय्यम भूमिका स्वीकारावी लागणार, हेही अधोरेखित झाले. या निवडणुकीत याआधी कधी नव्हे एवढे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात शिवसेनेच्या ताकदीबाबतही चर्चा होती. मात्र या संशयकल्लोळाला पूर्णविराम मिळाला. 

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनेचे यश शंभर नंबरी आणि खणखणीत आहे. यापुढील पाच वर्षांत, किंबहुना विधानसभा निवडणुकीनंतर पाच वर्षांत राजकीय उलथापालथ घडली नाही, तर शिवसेनाच छा गयी असे राहणार आहे. कोणताही राजकीय पक्ष लयाला जात नाही. तो पुन्हा उसळी घेतो. मात्र जिल्ह्यातील कॉंग्रेसबाबत असा आशावादही दाखवणे शक्‍य नाही. स्वाभिमानला आपली ताकद किती याचा विचारही करावा लागणार आहे. दापोलीत शिवसेनेला धक्का बसला आहे. विधानसभेसाठी तेथे काय वाढून ठेवले आहे. याचा विचार रामदास कदम आणि शिवसेनेला करावाच लागेल.या निकालाने जिल्ह्यात राजकारणामधील संशयकल्लोळाला अर्धविराम दिला आहे.

राजापूर-लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी आपली मांड पक्की केली. त्यांच्या आगामी उमेदवारीचीही निश्‍चिती झाली आहे. नीलेश राणे यांच्यामागे नारायण राणेंचे बळ असल्यामुळे आणि युतीचा निर्णय उशिरा झाल्याने स्वाभिमान शिवसेनेला टक्कर देईल,अशी अटकळ बांधली जात होती. राऊतांचे मताधिक्‍य कमी होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात गेल्यावेळेपेक्षा मतदानामध्ये फारसा फरक पडला नाही आणि राऊतांची विजयी आघाडीही गेल्यावेळच्या आसपास राहिली. याचा अर्थ शिवसेना आणि युती आहे तेथेच आहे. स्वाभिमानची ताकद वाढली परंतु अपेक्षांचा फुगा विनाकारण फुगवून ठेवला.

कोकणात रुजलेल्या (नारायण राणे यांनीच एकेकाळी मोठ्या नेटाने रुजवलेल्या) शिवसेनेला हटवणे, राजकारणातील खेळ 14 लाख मतदारांमध्ये करणेही सोपे नव्हते. हे लक्षात न घेता पंचायत समितीच्या राजकारणाप्रमाणे उलथापालथ करता येईल अशातऱ्हेने स्वाभिमानच्या राजकारणाची मांडणी झाली. कॉंग्रेस यावेळी राणे यांच्यासोबत नव्हती. भाजप पाठिंबा देणार होता,परंतु युती झाल्यामुळे तो मार्ग संपला.

राष्ट्रवादीला आघाडीच्या उमेदवारात रस नव्हता आणि राणेंना पाठिंबा देण्यातही. हे लक्षात घेता नीलेश राणेंनी मिळविलेली मतेही कौतुकास्पद आहेत. हा सारा राजकीय कॅनव्हास लक्षात घेता राणेंना वातावरण निर्माण करण्यात यश आले, शिवसेनेच्या मर्मस्थानांवर प्रहार करीत शिवसेनेला अंगावर घेण्यात स्वाभिमानला यश आले.काही ठिकाणी गर्दीही जमली, मात्र त्याचे मतांमध्ये रूपांतर करणे शक्‍य झाले नाही. शिवसेनेची मते हलली नाहीत. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला आता दुय्यमच भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रवादी खेड, गुहागर येथे टक्कर देऊ शकते. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीनही विधानसभा मतदारसंघातील युतीची आघाडी नुसती निर्णायक ठरली नाही, तर विजयाचे गणित त्यामुळे कोठच्या कोठे पोचले.

चिपळूण विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सुमारे 31 हजारांची आघाडी होती. यावेळी फक्त चिपळूण तालुक्‍यात 29 हजारांची आघाडी मिळाल्याचा शिवसेनेचा दावा आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा भलेभक्कम आघाडी मिळाली. त्यामुळे आमदार सामंत, आमदार साळवी आणि आमदार सदानंद चव्हाण या तीन शिलेदारांनी आपली बैठक भक्कम करून घेतली. आधीच्या चार वर्षांत शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी राज्यातील धोरणाप्रमाणे भाजपने जिल्ह्यातही वाटचाल केली, मात्र अखेरच्या क्षणी युती केल्याने भाजपच्या विरोधातली हवाच निघून गेली. तो विरोध असता तरी किती क्षीण असता हे आजच्या निकालाने दाखवून दिले.

कॉंग्रेस औषधापुरतीच आहे. स्वाभिमानची मते किती, याचा पडताळा निकालाने दिला. रायगड मतदारसंघाकडे जोडला गेलेला भाग वगळता,राष्ट्रवादीही जिल्ह्यात नगण्य आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे वर्चस्व अशी स्थिती आली आहे. 

युतीचा फार मोठा विजय झाला असला, तरी त्यामुळे लगेच कोकणच्या विकासाला चालना मिळेल,असा भाबडा समज करून घेण्याचे कारण नाही.कौल मानावाच लागतो. मात्र त्यामुळे वास्तव बदलत नाही. नाणारसारखा विकासाभिमुख आणि कोकणच्या अर्थकारणाला गती देणारा प्रकल्प येथून रद्द केल्यावरच युती झाली, आता यशही मिळाले. नाणार रद्द केल्याचा फायदाही शिवसेनेला मिळाला, असे सांगितले जाईल. मात्र ते स्वतःचे लटके समर्थन करून घेणारे ठरेल.

प्रचारकाळातही विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक चिखलफेक आणि उणीदुणी यावरच भर देण्यात आला. राणे यांच्या नावाने किंवा स्वाभिमान विरोधात एवढा ऊर बडवायला हवा होता का,असे शिवसेनेच्या नेत्यांना क्षणभर वाटून जाईल. आपला मतदार किती भक्कम आहे आणि त्याला बांधून ठेवण्यासाठी भडकवू भाषणे वा आमिषांची गरज नाही, हे शिवसेनेच्या ध्यानी आले असावे. या अर्थाने शिवसेनेचा भक्कमपणा अधोरेखित करणारा आणि संशयकल्लोळाला पूर्णविराम देणारा हा निकाल आहे. 

बदल घडवण्याचे संकेत 

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या अधिपत्याखाली दापोली आणि खेडमध्ये शिवसेनेने मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र तेथे शिवसेनेला धक्का बसला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम यांचे प्रमोशन सुरू आहे. तेथेही अंतर्गत वाद असून सूर्यकांत दळवी आपले स्थान भक्कम करण्यासाठी टपून बसलेले आहेत.शिवसेनेची येथील खालावलेली कामगिरी दापोली, खेडमधील राजकारणात बदल घडवून आणणारी ठरू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com