वडेट्टीवार, धानोरकर प्रचार करणार पण मतदान नाही...

भाजपचे आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आजच्या घडीला जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षित लोकप्रतिनिधी आहे. मुनगंटीवार यांच्याकडे अनेक पदव्या आहे. त्यांनी बी-कॉम, एम-कॉम, डीबीएम, कायद्याची पदवी, पत्रकारितेच्या पदवीसोबतच एम-फिल पूर्ण केले आहे. कॉंग्रेसचे राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे कला शाखेतील पदवीधर आहे.
Wadettiwar-Balu-Pratibha-Mungantiwar
Wadettiwar-Balu-Pratibha-Mungantiwar

चंद्रपूर : जिल्ह्यातील नेत्यांनी मोठमोठी राजकीय पदे मिळवली, पण पदवी मिळवण्यात ते अपयशी ठरले. यामध्ये आमदार, खासदार आणि मंत्र्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत, पण त्यांना मतदान करता येणार नाही. कारण ते पदवीधर नाहीत. माजी अर्थमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच पद आणि पदवी आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे पदवी नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. 

बोचऱ्या थंडीत नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा समोरासमोर आले आहे. परंतु उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारेच जिल्ह्यातील बहुतेक  विद्यमान आमदार, खासदार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाही. त्यांनी राजकीय जीवनात पद मिळवले. परंतु शैक्षणिक पदवीअभावी निवडणुकीत ते केवळ प्रचारप्रमुख आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात माजी अर्थमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार आणि कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडेच पद आणि पदवी आहे. या दोघांची मतदार म्हणून नोंदणी आहे.
 
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांचा नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. जवळपास दोन लाख दहा हजार पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी आहे. नागपूरनंतर सर्वाधिक सुमारे 38 हजार मतदार चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जयपराजयाचे गणित ठरविताना चंद्रपूरची भूमिका महत्त्वाची राहील. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने या जिल्ह्यातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले. चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची धुरा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आहे. परंतु यातील केवळ धोटेच मतदानासाठी पात्र आहेत. निवडणूक आयोगाकडील शपथपत्रानुसार जिल्ह्यातील बहुतांश आमदार पदवी प्राप्त नसल्याचे दिसून येते. 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार दहावा वर्ग उत्तीर्ण आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वसंत विद्यालयातून वडेट्टीवार 1978-79 मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. खासदार धानोरकर यांनीसुद्धा बीए प्रथम वर्षानंतर शिक्षणाला जय महाराष्ट्र केला. सोबतच त्यांनी औषधशास्त्र पदविकेची प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर बीए प्रथम वर्षाच्या पुढे जाऊ शकल्या नाही. चिमूरचे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांनी सन 2014 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दहावी अनुत्तीर्ण असल्याचे सांगितले होते. 1997 मध्ये भांगडिया चिमूर येथील नेहरू विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी होते. परंतु ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. 

आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवास सुरू केला. त्यांनी वर्षभरापूर्वीच वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा दिली. सन 2019 मधील शपथपत्रात ते वाणिज्य शाखेचे प्रथम वर्षाची परीक्षा दिल्याचा उल्लेख आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवारसुद्धा दहावीच्या पुढे जाऊ शकले नाही. ते उत्तीर्ण झाले. परंतु पुढच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला नाही. आता याच लोकप्रतिनिधींवर पदवीधर मतदारसंघातील स्वपक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर मतदानासाठी (नोंदणी केलेला) पात्र असतो. परंतु प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या बहुतेकांकडे पदवी नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. 

मुनगंटीवार, धोटे मतदार 
भाजपचे आमदार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आजच्या घडीला जिल्ह्यातील  सर्वाधिक शिक्षित लोकप्रतिनिधी आहे. मुनगंटीवार यांच्याकडे अनेक पदव्या आहे. त्यांनी बी-कॉम, एम-कॉम, डीबीएम, कायद्याची पदवी, पत्रकारितेच्या पदवीसोबतच  एम-फिल पूर्ण केले आहे. कॉंग्रेसचे राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे कला शाखेतील पदवीधर आहे. या दोघांनीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी जिवाचे रान करतील. परंतु मतदान मात्र हे दोघेच देऊ शकतील. 

जोशी बीकॉम, वंजारी एलएलबी
भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी तर महाविकास आघाडीने अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरविले. जोशी बी. कॉम, तर वंजारी यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. वऱ्हाडी भाषेत शिकविणारे "यू-ट्यूब'स्टार नीलेश खराळे यांचीही उमेदवारी लक्षवेधी ठरली आहे. खराळे बीएस्सी, बीएड आहेत.

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com