मुंबई: रेल्वेने पाणी आणावे लागलेल्या लातूरसह संपूर्ण मराठवाड्याला वरदान ठरणारी मराठवाडा वॉटरग्रीड योजना राज्य शासनाने रद्द केली आहे. दुष्काळाशी मुकाबला करणार्या मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड योजनेची गरज असून ही तात्काळ सुरु करण्यात यावी, यासाठी येत्या काळात भाजपाच्या वतीने मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
प्रदेश भाजपाच्या माध्यम विभागामार्फत राज्यातील जिल्हा भाजपा प्रसिद्धी प्रमुखांची दोन दिवसाची कार्यशाळा नूकतीच मुंबईत पार पडली. या कार्यशाळेचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी फडणवीस म्हणाले, आज सोशल मिडीयाचा प्रभाव खूप वाढला आहे. पक्षाच्या माध्यमातून झालेल्या कामाची आणि विचाराची प्रसिद्धी करणे ही खूप महत्वाची जबाबदारी आहे. हे करत असतांनाच एखाद्या चुकीच्या माहितीवरून वादंग निर्माण होणार नाही यासाठी देखील जागरूक राहून प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे, असेआवाहन केले.
तसेच त्यांनी कामात येणाऱ्या अडचणी, पक्षाची भूमिका याबाबत विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरेही दिली. लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले, एवढी भयावह दुष्काळी स्थिती अनुभवल्याने भाजपा सरकारने मंजूर केलेला मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गुंडाळला. तेंव्हा याबाबत पक्षाने भूमिका घ्यावी, अशी मागणी लातूर जिल्हा भाजपा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कातळे यांनी केली. यावर येत्या काळात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाबाबत भाजपाच्या वतीने मराठवाड्यात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन माध्यम विभागाचे राष्ट्रीय संयोजक अनिल बलुनी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेतील सत्रात भाजपाचे संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी मंत्री आशिष शेलार, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय, प्रदेश मिडीया सेलचे विश्वास पाठक, ओमप्रकाश चव्हाण यांच्यासह अनेकांनी समन्वय, नम्रभाषा, सातत्य, संपर्क, माहितीचा साठा, जबाबदारी, कर्त्यव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.