स्टील प्लान्टच्या भरवशावर आपण राहू शकत नाही, राज्याने ऑक्सिजन प्लान्ट निर्माण करावे...

महिनाभरात प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. रेडमेसिव्हिरची आता कमी नाही. पण ब्लॅक फंगसचे खूप भयंकर परिणाम आहेत. शासनाने जीवनदायी योजनेत याचा समावेश केला, हे चांगले झाले. पण या रोगावर औषध सर्वांना परवडेल, अशा भावात उपलब्ध होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
Nitin Gadkari
Nitin Gadkari

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच (Corona's Secone Wave) आपल्या यंत्रणेची दाणादाण उडाली आहे. या लाटेचा कहर थांबत नाही तोच तिसरी लाट येऊ पाहात आहे. (The third wave is about to come) त्यामुळे ऑक्सिजनसाठी आता आपण केवळ स्टील प्लान्टच्या (Steel Plants) भरवशावर राहू शकत नाही. तर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्टील प्लान्ट निर्माण केले पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचे प्लान्ट निर्माण करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

50 पेक्षा अधिक रुग्णशय्येच्या हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लान्ट बंधनकारक करण्यात यावा, असेही गडकरींनी सांगितले. धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्लान्टचा शुभारंभ आभासी कार्यक्रमात करण्यात आला. इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले, साखर कारखान्यांची स्थिती सध्या फारशी चांगली नाही. डिस्टिलरी बंद करून ऑक्सिजन निर्मिती करणे फायद्याचे ठरत नाही, तर ऑक्सिजन निर्मिती हे ‘बाय प्रॉडक्ट’ असेल तर ते फायदेशीर ठरते. विदर्भात आता 12 ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. यांपैकी 1 प्लान्ट उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. वेकोलिनेही आपल्या सामाजिक दायित्व निधीतून चंद्रपूर आणि नागपुरात ऑक्सिजन प्लान्टसाठी मदत केली आहे.

राज्यातील 50 पेक्षा अधिक रुग्णशय्या असलेल्या हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लान्ट बंधनकारक करण्याची सूचना गडकरी यांनी यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केली. स्टील प्लान्टमध्ये ऑक्सिजन हा ‘बाय प्रॉडक्ट’ आहे. 5 कोटीत एका जिल्ह्यात प्लान्ट सुरू होऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यात असे प्लान्ट सुरू झाले पाहिजेत. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असताना स्टील प्लान्टच्या भरवशावर आपण राहू शकत नाही.

महिनाभरात प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. रेडमेसिव्हिरची आता कमी नाही. पण ब्लॅक फंगसचे खूप भयंकर परिणाम आहेत. शासनाने जीवनदायी योजनेत याचा समावेश केला, हे चांगले झाले. पण या रोगावर औषध सर्वांना परवडेल, अशा भावात उपलब्ध होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com