

BJP expansion in Ahilyanagar : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.
महायुतीच्या जागावाटपानुसार अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी तनपुरे यांनाच मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) विजयी झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या आमदारांची संख्या सातवर पोहोचणार आहे. मात्र या आकड्यामागे एक वेगळीच राजकीय कथा दडलेली आहे. जिल्ह्यातील सातपैकी केवळ दोनच आमदार हे सुरुवातीपासून भाजपशी निष्ठावंत राहिलेले आहेत. उर्वरित बहुतांश नेत्यांनी 2014 नंतर विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचा (BJP) झेंडा खांद्यावर घेऊन सुरवातीपासून काम करणाऱ्या नेत्यांमध्ये राम शिंदे आणि सुनील कर्जतकर यांचा समावेश होतो. विधान परिषदेतून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे हे दोनच नेते भाजपच्या मूळ संघटनात्मक पायाभरणीशी जोडलेले मानले जातात.
अहिल्यानगरच्या सध्याच्या भाजप नेतृत्वात अनेक प्रभावशाली चेहरे हे मूळचे इतर पक्षांतून आलेले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय मूळ काँग्रेसमध्ये आहे. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मजल मारलेल्या विखे पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.
मोनिका राजळे यांनी 2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग तीन वेळा त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. राहुरीतून अक्षय कर्डिले हे त्यांचे दिवंगत वडील शिवाजी कर्डिले यांच्या जागेवर पोटनिवडणुकीतून निवडून आले आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या वाटचालीचे राजकीय टप्पे वेगवेगळे राहिलेत. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांचे वडील बबनराव पाचपुते यांनी 2014 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2024 मध्ये विक्रम पाचपुते यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवत हा राजकीय वारसा पुढे नेला. विवेक कोल्हे हे कोपरगावातील भाजपचा युवा चेहरा म्हणून उदयास आले आहेत. विधान परिषदेत त्यांना बिनविरोध संधी देण्यात आली होती.
या ‘आयात’ आमदारांच्या यादीत आता सातवे नाव जोडले जाणार आहे ते प्राजक्त तनपुरे यांचे. कालपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आक्रमक समर्थक आणि महाविकास आघाडीचे प्रमुख चेहरे असलेले तनपुरे आता भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची जिल्ह्यातील ताकद आणखी वाढणार असली, तरी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.
भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावामागे बाहेरून आलेल्या नेत्यांचा मोठा वाटा असला, तरी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये सुप्त नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. "वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते बाजूला राहतात आणि सत्तेच्या गणितासाठी इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांनाच आमदारकीची संधी मिळते," अशी भावना अनेक जुने पदाधिकारी खासगीत व्यक्त करत असल्याचे बोलले जाते. मात्र राजकीय वास्तव पाहता, प्राजक्त तनपुरे यांच्या प्रवेशामुळे अहिल्यानगरमध्ये भाजपची पकड आणखी मजबूत होणार असून आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक दृढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.