एसपी कार्यालयातील तोडफोडीनंतर नगर जिल्ह्याला  झाली SP कृष्ण प्रकाश यांची आठवण! 

एसपी कार्यालयातील तोडफोडीनंतर नगर जिल्ह्याला  झाली SP कृष्ण प्रकाश यांची आठवण! 

नगर - महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर नगरमध्ये झालेल्या दोन राजकीय हत्यांमुळे नगर शहर आणि जिल्ह्यात तणापवूर्ण शांतता आहे. दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या खुनानंतर चौकशीसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलविण्यात आले होते. मात्र भावनेच्या भरात पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करेपर्यंत त्यांच्या समर्थकांची मजल गेली. नगर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा थेट एसपी कार्यालयावर हल्ला झाल्याची ही पहिलीच घटना होती. 

शनिवारी नगरला झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येच्या घटनेमुळे नगर पोलिसांचा वचक कमी झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेत नगर जिल्ह्यातील अनेकांना आठवली ती तत्कालीन एसपी कृष्णप्रकाश यांची कारकिर्द. दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या खूनप्रकरणी शिवाजीराव कर्डिले, अरुण जगताप आणि संग्राम जगताप अशा तीन आमदारांची नावे फिर्यादित नमूद करण्यात आली आहेत. या शिवाय नगर शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भानुदास कोतकर व नगरचे माजी महापौर असलेले कोतकर यांचे चिरंजीव संदीप कोतकर यांचेही नाव या फिर्यादीत आहे. 

या कर्डिले, कोतकर व जगताप या एकमेकांचे नातेवाईक असलेल्या कुटुंबांची नगरमध्ये दादागिरी असल्याचा बोलबाला होता. हे तिघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. कृष्ण प्रकाश यांनी कर्डिले यांच्यासह भानुदास कोतकर व त्यांच्या तिघा मुलांना अटक केली. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील सगळेच राजकारणी कृष्णप्रकाश यांना वचकून राहायचे. कृष्णप्रकाश यांच्या काळात एरव्ही पोलिसांच्या बदल्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे डीएसपी आॅफिसकडे फिरकलेही नव्हते. इतकेच नव्हे, तर बदलीसाठी पत्र देण्याचे धाडसही जिल्ह्यातील एकाही मातब्बर नेत्याने केले नाही. आता मात्र थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसून चौकशी चालू असलेल्या आपल्या नेत्याला पोलिसांसमक्ष घेवून जाण्याची व पोलिस अधीक्षक कार्यालय तोडण्यापर्यंत समर्थकांची मजल गेली. 


लॉटरीचालक अशोक लांडे खून प्रकरणात कृष्ण प्रकाश यांनी कोतकर आणि कर्डिले यांना बेड्या ठोकल्या होत्या. या खून प्रकरणात कोतकर यांच्यासह त्यांच्या तीन मुलांना जन्मठेप झाली. कर्डिले यांनाही कित्येक दिवस जेलमध्ये राहावे लागले. नंतरही त्यांना बरेच दिवस जिल्हाबंदी होती. मेडिकल ग्राऊंडवर सध्या भानुदास कोतकर हे जामिनावर तुरुंगातून सुटलेले आहेत. ते वास्तव्यास पुणे जिल्ह्यात  असतात. मात्र तेथूनच ते सारा कारभार हाकत असल्याचे बोलले जाते. 

कृष्णप्रकाश यांनी दूध भेसळीत अडकलेल्या अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात डांबले होते. त्यामुळे वैद्यकीय व इतर घोटाळे करणा-यांनाही त्यांनी सुतासारखे सरळ केले होते. साहजिकच त्यांचा  धसका ग्रामीण भागातील नेत्यांनीही घेतला होता. रस्त्यावर वाहन चालकांना अडवून चिरीमिरी गोळा करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांवरही त्यांनी खंडणीचे गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहिले नव्हते. 

केडगावमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोचलेही नाहीत. या प्रकरणातील संवेदनशीलता त्यांच्या लक्षातच आली नाही. परिणामी आयपीएस केडरमधील अधिका-यासह इतर पोलिस अधिका-यांना शिवसेना समर्थकांच्या धक्काबुक्की व शिवीगाळीचा प्रसाद मिळाला. पोलिसांच्या वाहनांवरही त्यांनी दगडफेक केली. पब्लिक काँन्टॅक्ट कमी झाल्यानंतर अथवा जनतेमध्ये मिसळून सर्व घटकांशी समरस होणारी पोलिसिंग न केल्यानंतर काय होते, हे पोलिसांनी केडगावात शनिवारी अनुभवले. स्थानिक पोलिसांचा वचक कमी झाल्याने खुद्द अतिरिक्त पोलिस महासंचालकांना थेट नगरमध्ये ठाण मांडावे लागले आहे. सहकार, राजकारणांसह अनेक क्षेत्रांमध्ये वेगळे मापदंड तयार करणा-या नगर जिल्ह्यासाठी ही बाब निश्चित भूषणावह नाही, हेही तेवढेच खरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com