मी लहाणपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे आता प्रत्येक सभेतून सांगू का? : अजित पवार

मी लहाणपणी कोंबड्यांची अंडी विकायचो, हे आता प्रत्येक सभेतून सांगू का? : अजित पवार

भवानीनगर :- भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चहाविक्रीच्या होत असलेल्या मार्केटींगवरून अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांनी खिल्ली उडवत सणसरमधील सभेत हास्याचा कल्लोळ उडवून दिला.

सभेत बोलताना अजित पवार म्हणाले,``आमची पोल्ट्री होती, आजही आहे. राजकारणात येण्यापूर्वी मी कोंबड्यांची अंडी मोजत होतो. गायींची धार काढायचो. तो माझा व्यवसाय होता. त्यावेळची माझ्या कुटुंबाची ती गरज होती. आजही माझा शेतीचा व्यवसाय आहे. पण म्हणून प्रत्येक सभेत मी कोंबड्यांची अंडी विकत होतो, मोजत होतो हे काही सांगत फिरत नाही. मोदी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र याचेही भांडवल केले. कोणाला कुठे फसवावे काही कळत नाही राव!``

``मला दोन दिवसांपूर्वी भुजबळसाहेब म्हणाले, अरे अजित, मोदींच्या चहा विक्रीविषयी जे बोलले जातेय ना, त्याची खात्री करण्यासाठी मी त्या रेल्वे स्टेशनची माहिती घेतली. मोदी ज्या वयात चहा विक्री करीत होते असे सांगतात, त्या काळात तिथे ते रेल्वे स्टेशनच नव्हते. आता घ्या, किती खोटे बोलायचे बाबांनो!``, असे सांगत अजितदादांनी हास्य फुलविले.

``माझी आई आता ८२ वर्षे वयाची आहे. मी सणसरची सभा उरकून काटेवाडीत जाणार आहे, तिला भेटणार, काही दिवस झाले, धावपळीत तिला भेटलेलो नाही. तिच्या प्रकृतीची विचारपूस करणार आणि मग पुढे जाणार! आता विषय आला म्हणून सांगितले, नाहीतर सांगायची काय गरज आहे? आई आहे, तिची विचारपूस केलीच पाहिजे. तिला भेटलेच पाहिजे. यासाठी जगाला दाखवायची काय गरज आहे? पण नाही. आता माझ्या जागी `ते` असते, तर त्यांनी अगोदर कार्यकर्त्यांकरवी चॅनेलवाल्यांना सांगितले असते. मग चॅनेलवाले आधीच जाऊन तिथे थांबले असते. तिथे अगोदरच दोन खुर्च्या घराच्या दरवाज्याबाहेर मांडल्या असत्या. मग `ते` तिथे गेल्यानंतर बाहेरच आईला भेटले असते. आईला तोंडावरून हात फिरवायला लावला असता. आणि मग आईभक्त म्हणून सगळीकडे भावनिक बातम्या फिरवल्या असत्या. अरे, काय नाटके लावलीत राव!,`` अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या कृतीवर टीका केली.

``माझी आई ८२ वर्षाची आहे, तिच्या प्रकृतीचा विचार करता तिला पैसे हवे असतील, तर मीच व्यवस्था करणार ना! अगदीच शक्य नसेल तर पैसे काढायला मी पीएला लावले असते, उगीच दाखवायला म्हणून उन्हातान्हात रांगेत नसते उभे केले! केवळ देशाला दाखवण्यासाठी असली नौटंकी करून हे सत्तेवर आले आणि त्यांच्या असल्या नाटकीपणात बळजबरीने उभे केलेल्या नोटाबंदीच्या रांगेत १०० जण मेले,`` असा आरोप त्यांनी केला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ``राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारने अमावास्येला शपथविधी केला आणि साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात यांनी अंधार आणला. आघाडीच्या थोड्या चुकांमुळे भाजपवाल्यांची सत्ता येते. पण पाच वर्षातच लोक यांना ओळखून सोडतात.`

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com