अजितदादांना जुळेना विधान परिषदेचे गणित! पराभवाची हॅटट्रिक

राज्यात काल लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या विश्लेषणात एक मु्द्दा महत्त्वाचा ठरला आहे.राज्याच्या राजकारणात "दादा' असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधान परिषद निवडणुकीत सलग तिसरा पराभव होता! एकप्रकारे अजितदादांनी पराभवाची हॅटट्रिकच केली. सोलापूरपासून सुरू झालेला हा पराभवाचा प्रवास नाशिकपर्य़ंत येऊन पोचला.
अजितदादांना जुळेना विधान परिषदेचे गणित! पराभवाची हॅटट्रिक

पुणे : विधान परिषद निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. शिवसेनेने अनपेक्षितपणे दोन जागा खेचून आणल्या. त्यात कॉंग्रेसची धूळधाण झाली. भाजपने हक्काच्या दोन जागा राखल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोकणची जागा राखली, पण नाशिकची हक्काची जागा गमावली.

येथे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी चमत्कार घडवून राष्ट्रवादीच्या ऍड. शिवाजी सहाणे यांना धूळ चारली. दराडे यांच्या विजयात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या छगन भुजबळ यांचा हात होता किंवा नाही, हा आज तरी वादाचा विषय असला, तरी या निकालाचे आणखी एक विश्लेषण म्हणजे, राज्याच्या राजकारणात "दादा' असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधान परिषद निवडणुकीत सलग तिसरा पराभव होता! एकप्रकारे अजितदादांनी पराभवाची हॅटट्रिकच केली, असं म्हणायला पाहिजे.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला पराभवाचा हा प्रवास साताऱ्यानंतर आता नाशिकपर्यंत पोचला आहे. विशेष म्हणजे या तीनही ठिकाणची रणनीती अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाली होती. आणखी विशेष म्हणजे, या तीनही ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता.


लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर साधारण वर्षभरानंतर झालेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा हक्काचा! राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची येथे आघाडी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार दीपकआबा साळुंखे यांचा विजय येथे निश्चित मानला जात होता. या निवडणुकीची सर्व सूत्रे अजितदादांनी आपल्या हाती घेतली होती. पण, भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी येथे धक्कादायकरित्या येथे विजय खेचून आणला. तोही 134 मतांच्या फरकांनी! जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा हा निकाल होता.
 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यभरात धक्के बसल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकच बालेकिल्ला मजबूत राहिला होता, तो म्हणजे सातारा! राष्ट्रवादीची राज्यात पुणे जिल्ह्याच्या बरोबरीने किंबहुना अधिकची ताकद सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित मानला जात होता. सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केले आहे. जयकुमार यांना रोखण्यासाठी अजितदादांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांनाच थेट राष्ट्रवादीत आणले आणि विधान परिषदेचे तिकीटही दिले. त्यातून भविष्यात माणची विधानसभेची जागा खेचून आणण्याचे अजितदादांचे गणित होते.

तेथेही माशी शिंकली. राज्याच्या राजकारणातील दिग्गज म्हणून ओळखले गेलेले पतंगराव कदम यांनी आपले बंधू मोहनराव कदम यांना येथे रिंगणात उतरवले. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीत बिघाडी झालेली होती. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली. तरीही राष्ट्रवादीला विजयाची खात्री होती. स्वतः अजितदादा तळ ठोकून होते. पण, मतांचे गणित त्यांना जुळलेच नाही आणि राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला. तोही 63 मतांचा!
 
या दोन धक्‍क्‍यानंतरही राष्ट्रवादीला किंबहुना अजितदादांना जाग आली नाही, असंच आता म्हणावे लागेल. कारण, भाजपने पाठिंबा दिलेला असताना आणि हिरे कुटुंबीयांचे पाठबळ मिळालेले असतानाही नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. येथील निवडणुकीची सूत्रे अजितदादांचनी हाती घेतली होती. दोन दिवस ते नाशकात तळ ठोकून होते. पण, येथेही त्यांचे गणित चुकलेच! तेही 168 मतांच्या फरकाचे. आता या पराभवाला अनेक कारणे दिली जात आहेत. अगदी छगन भुजबळ यांच्यापासून भाजपकडे बोट दाखवले जात आहे. पण, अजितदादांचे गणित चुकलेच! आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषद निवडणुकीच्या पराभवाची हॅटट्रिक झाली! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com