फडणविसांनी `या जिल्ह्यातील` भाजपच्या सर्वच आमदारांना दिला डच्चू!

फडणविसांनी `या जिल्ह्यातील`  भाजपच्या सर्वच आमदारांना दिला डच्चू!

नागपूर : विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले असून नऊ विद्यमान आमदारांना त्यांच्या पक्षांनी डच्चू दिला. त्यांच्या जागी नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. त्यातील आठ आमदार एकट्या भाजपचे असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यातील एक प्रमुख वजनदार नाव आहे. अनेक इच्छुकांना तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरीचेही पेव विदर्भात फुटले आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक यांनी यावेळी पक्षाला उमेदवारीच मागितली नव्हती. या क्षेत्रातील त्यांचे वजन पाहता राष्ट्रवादीने त्यांच्या जागी त्यांचा मुलगा इंद्रनील नाईक याला तिकीट दिले आहे. डच्चू दिलेल्या यादीतील एक प्रमुख नाव भारिप-बमसंचे बळीराम सिरस्कार हे आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे बिनीचे शिलेदार असलेले सिरस्कार यांना आंबेडकरांनी यंदा वंचित बहुजन आघाडीची तिकीट मात्र दिले नाही. त्यांच्याऐवजी तेथून धैर्यवान फुंडकर यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादीने येथे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे यांचा मुलगा संग्राम याला रिंगणात उतरवले आहे.

भाजपने नऊ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. त्यातील प्रमुख नाव चंद्रशेखर बावनकुळे यांचे आहे. काल रात्रीपासून चाललेल्या नाट्यानंतर अखेर बावनकुळेंना तिकीट मिळणार नाही हे निश्‍चित झाले. त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.


अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांना पक्षाने डच्चू दिला आहे. त्यांच्या जागी प्रशासकीय सेवेतील रमेश मावस्कर यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. येथे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी बच्चू कडू यांच्या प्रहारशी हात मिळवला असून त्यांची उमेदवारी प्राप्त केली आहे. दर्यापुरातून (अमरावती) भाजपला तिकीट मागणाऱ्या सीमा साळवे यांना पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांना पक्षाने डच्चू दिला. त्यांच्याऐवजी पक्षाने माजी आमदार मोहन मते यांना पुन्हा तिकीट दिले आहे. काटोल (नागपूर) येथून भाजपकडून निवडून आलेले आमदार आशीष देशमुख यांनी नंतर आमदारकीचा व पक्षाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना यावेळी कॉंग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. त्याचप्रमाणे भाजपची खासदारकी सोडून पक्षाला रामराम ठोकणारे नाना पटोले यांना कॉंग्रेसने साकोली (भंडारा) येथून उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपने विधान परिषदेतील विद्यमान आमदार व मंत्री परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे. उमरखेड (यवतमाळ) येथील भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांनाही पक्षाने डावलले असून त्यांच्या जागी नामदेव ससाणे यांना उमेदवारी दिली आहे. याच जिल्ह्यातील राजू तोडसाम (आर्णी) यांनाही पक्षाने डच्चू देऊन माजी आमदार संदीप धुर्वे यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे.

गोंदियात गतवेळी कॉंग्रेसकडून गोपालदास अग्रवाल हे निवडून आले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गोपालदास अग्रवाल यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला व भाजपात प्रवेश केला. भाजपनेही त्यांना तिकीट दिले. त्यामुळे तेथील इच्छुक विनोद अग्रवाल यांनी बंडखोरीचा बिगुल वाजवला आहे. चंद्रपुरात कॉंग्रेसने महेश मेंढे यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मेंढेंची उमेदवारी रद्द करून शिवसेनेतून आलेले किशोर जोरगेवार यांना उमेदवारी दिली आहे.

भंडाऱ्यात सर्वांनाच डच्चू
भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार होते. तुमसरमध्ये चरण वाघमारे, भंडारा येथून रामचंद्र अवसरे व साकोली राजेश काशीवार हे ते तीन आमदार होते. यंदा पक्षाने तिघांनाही डच्चू दिला आहे. त्यातील भंडारातून डॉ. अरविंद भालाधरे यांना तिकीट दिले आहे. तुमसरमधून प्रदीप पडोळेंवर पक्षाने डाव लावला आहे. तर, साकोलीतून विद्यमान मंत्री परिणय फुके यांनाच मैदानात उतरवले आहे.

अहेरीत आघाडीच विसंवाद
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षातील विसंवाद समोर आला. येथून कॉंग्रेसच्या अधिकृत यादीत दीपक आत्राम यांना पक्षाचे तिकीट दिले. तर भाजपात प्रवेश करणार, अशी ज्यांच्याबाबत चर्चा होती, ते धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत यादीत उमेदवारी पटकावली. आता यातील कुणी माघार घेते की "मैत्रिपूर्ण' लढतीचे नाट्य रंगते, हे येत्या एक-दोन दिवसात दिसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com