नितीश मंत्रिमंडळात 27 नवे सदस्य 

नितीश मंत्रिमंडळात 27 नवे सदस्य 

पाटणा ः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी  मंत्रिमंडळाचा विस्तार करत 27 सदस्यांचा समावेश केला. त्यात संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) 14, भाजपचे 12 आणि लोक जनशक्ती पक्षाच्या एका सदस्याचा समावेश आहे. शपथविधीच्या कार्यक्रमावर राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बहिष्कार घातला होता. 

राजभवनात झालेल्या कार्यक्रमात हंगामी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. लोक जनशक्ती पक्षाचे पशुपतीकुमार पारस यांना मंत्रिपद मिळाले असून, ते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. बिहार विधानसभेतील सदस्यसंख्या लक्षात घेता, जास्तीत जास्त 35 मंत्री घेता येऊ शकतात; पण आज 27 जणांना शपथ देण्यात आली. 

गरजेनुसार मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार केला जाण्याचा अंदाज आहे. जेडीयू-एनडीएच्या या मंत्रिमंडळात समाजातील सर्व घटकांना स्थान देण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांनी केला आहे. नव्या मंत्रिमंडळात यादव आणि मुस्लिमांचे प्राबल्य कमी झाल्याचे दिसते. राष्ट्रीय जनता दलाचे दिवंगत माजी मंत्री आणि माजी खासदार सीतारामसिंह यांचा मुलगा रणधीरसिंह यांचाही आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये समावेश आहे. रणधीरसिंह भाजपमध्ये आले आहेत. 

"जातियवादाच्या नावाखाली भ्रष्टाचाराच्या आरोपापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न काही जण करतात, पण तसे होऊ दिले जाणार नाही,' असे नितीशकुमार यांनी शपथविधी कार्यक्रमानंतर बोलताना स्पष्ट केले आणि बिहारचा विकास आता आणखी वेगाने होईल, अशी आशा व्यक्त केली. बिहारच्या विकासाला केंद्राची साथ मिळेल, असेही ते म्हणाले. बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष पॅकेज देण्याची आमची मागणी योग्यच आहे आणि केंद्र सरकार ती नाकारणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
भाजपला महत्त्वाची खाती? 
नितीशकुमार यांच्या नव्या सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उप मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी तसेच नंदकिशोर यादव, प्रेमकुमार आदी सदस्यांना महत्त्वाची खाती मिळण्याचा अंदाज आहे. राज्यातील मागील सरकारमध्ये सुशीलकुमार मोदी यांच्याकडे अर्थ, तर नंदकिशोर यादव यांच्याकडे रस्ते खाती होती. "महागठबंधन' सरकारच्या काळात हीच खाती लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com