आशिष शेलारांनी पोलिस आयुक्तांना दिली अंमली पदार्थ्यांच्या अड्ड्यांची यादी

१९९० च्या उत्तरार्धात ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नष्ट केले त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या या सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.अशा नेटवर्कमधील संबंधीत मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे
Ashish Shelar Met Mumbai Police Commissioner
Ashish Shelar Met Mumbai Police Commissioner

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या केसच्या तपासात चर्चेत आलेल्या ड्रग्ज, पब आणि पार्टी कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात असून त्याविरोधात गेली अनेक वर्षे लढणाऱ्या भाजपा नेते आणि वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अॅड.आशिष शेलार यांनी आज मुंबई पोलिस आयुक्तांची  भेट घेतली.

त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून या अड्ड्यांवर धडक कारवाईची मागणी केली आहे. या पत्रात आमदार अॅड. आशिष शेलार म्हणतात, "मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात मी आपले आज पुन्हा लक्ष वेधत आहे. हे अड्डे हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. सुशांतसिंग राजपूतचा शोकजनक दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या केसच्या तपासात त्यांच्या मित्रमंडळातील अनियंत्रित अमली पदार्थांचा वापर केल्याचे मीडियातून समोर येत असल्याने पुन्हा एकदा ड्रग्जचा विषय ऐरणीवर आला आहे,''

शेलार पुढे म्हणाले, ''गेल्या वर्षात मी या विषयात कडक कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसांकडे वारंवार विनंती केली होती. मी १४ मार्च २०२० रोजी वांद्रे सीलिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डिसीपी, अँटी नारकोटिक्स सेलला एक सविस्तर पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. किंवा त्याबाबत मला माहिती देण्यात आली नाही. ड्रग्जचे सेवन देशातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त करीत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरूद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे,''

''मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्र विरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबईवर मुख्य लक्ष्य आहे.माझ्या वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघ क्षेत्रात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पब पैकी बर्‍याचजणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे आणि परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाईटलाइफ पार्ट्या सुरु असतात. हीच ठिकाणे दुर्दैवाने बेकायदेशीर ड्रगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोस पणे सुरु आहे.'' असेही शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

१९९० च्या उत्तरार्धात ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नष्ट केले त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या या सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.अशा नेटवर्कमधील संबंधीत मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

सुशांतसिंग राजपूत यांच्या साथीदारांनी वापरलेले बेकायदेशीर ड्रग्ज वांद्रेमधील खालील ठिकाणांहून ड्रग्ज टोळ्यांकडून आणले गेले असावेत, अशीही चर्चा आता कानी पडू लागली आहे. त्यामुळे याचे गांभीर्य आता तरी पोलीस प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे. 

आपल्या मतदारसंघात असलेल्या या अड्ड्यांची यादीही आशिष शेलार यांनी पोलिस आयुक्तांना दिली आहे. ही ठिकाणे अशी आहेत;

१-  वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर

२-  वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू

३-  वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण कुमार वैद्य नगर समोर

४-  गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी

५- मुरगन चाळ, सांताक्रूझ पश्चिम

६- वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर

७- ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रिक्लेमेशन

''माझ्या मतदार संघातील या परिसरांची नावासहीत माहिती मी वारंवार देऊन कारवाईची मागणी यापूर्वी ही केली आहे. तरी कृपया पुन्हा आपल्याला मी विनंती करीत असून वांद्रे पश्चिम परिसरात पोलिसांनी धडक मोहीम राबवून अमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करावेत. सुशांत सिंह रजपूत प्रमाणे अन्य हजारो तरुणांना या जाळ्यापासून वाचवावे अशी विनंती मी करतो,'' असे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. 
Edited By- Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com