जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर खानदेशात भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी दिवाळीनंतर जळगाव जिल्ह्यात भाजपमधून राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाच्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन केल्याची घोषणा केली आहे.
या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, नाथाभाऊ गेल्याने भाजपला फरक पडत नाही असे ते म्हणत आहेत. असे असले तरी रोज बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्ष सोडून जाऊ नका, अशी विनवणी भाजप कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी करीत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आपले पक्षप्रवेश सोहळे असेच सुरूच राहणार असून, दिवाळीनंतर मोठ्या प्रवेश सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या वेळी व्यासपीठावर एकनाथ खडसे यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील, राष्ट्रवादीचे रावेर तालुका सरचिटणीस वाय. डी. पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संदीप खाचणे उपस्थित होते.
निंभोरा येथील ग्रामपंचायत सदस्य, सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते व तरुण कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा मुक्ताईनगरातील अॅड.रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी पार पडला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये रावेर तालुका भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष सचिन महाले, ग्रामपंचायत सदस्य तथा निंभोरा भाजप शहराध्यक्ष प्रभाकर सोनवणे, माजी ग्राम पंचायत सदस्य तथा सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष हरेश्वर चौधरी यासह इतरांचा समावेश आहे.
खडसे इफेक्ट : भाजप जळगावच्या स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेणार
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आता जिल्ह्यात ‘अॅक्शन मोड’मध्ये आला आहे. जळगाव शहरातही पक्षाच्या बळकटीची नवीन रचना करण्यात येत असून, त्याची सुरवात महापालिकेपासून करण्यात येणार आहे. महापालिकेतील चार स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात येत असून, त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. उपमहापौरपदासाठी चार जण इच्छुक असून, त्यांच्या नावाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.