सदाभाऊ-जयाजी...दोघेही कटप्पा! 

सदाभाऊ व जयाजीराव कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा विश्‍वास असणारे नेते होते, मात्र दोघांनी या संपाची वाट नियोजनबद्ध लावली. गेले काही दिवस राज्यात कटप्पा कोण आणि बाहुबली कोण, यावर चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्रीही त्यावर बोलले. कोणी कुणाला आणि कां मारले, हे समजण्यासाठी बाहुबलीचा दुसरा पार्ट दाखवू ,असे म्हणाले. फडणवीस "पार्ट 2' दाखवतील, त्यावेळी काय कळायचे ते कळेल. आजच्या घडीला मात्र बाहुबलीरुपी बळीराजाला सदाभाऊ, जयाजी या कटाप्पांनी मारले, अशीच महाराष्ट्राची जनभावना आहे!
सदाभाऊ-जयाजी...दोघेही कटप्पा!
सदाभाऊ-जयाजी...दोघेही कटप्पा!

"तोंडी भाषा शेतकरी हिताची, कृती मात्र सरकारच्या सोयीची' अशाप्रकारची भूमिका मंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांनी तर शेतकरी नेते म्हणून जयाजीराव सूर्यवंशी यांनी निभावली. सदाभाऊंनी शेतकरी अजेंडा गुंडाळून ठेवला, त्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचे प्रवक्‍ते बनत शेतकऱ्यांनाच गुंडाळले. जयाजी सूर्यवंशी तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सूर्याजी पिसाळ ठरले. सदाभाऊंच्या पाठीमागे मुख्यमंत्र्यांचा हात आधीपासून आहेच, संप संपविण्यासाठी साथ दिल्याबद्दल तो आता जयाजीरावांच्या पाठीवरही आला आहे. या हाताची जादू इतकी की या कटाप्पांनी सगळे काम तमाम केले...! 

पुणतांबा या नगर जिल्ह्यातील गावात एप्रिलमध्ये शेतकरी संपाची हाक देण्यात आली. महिना दीड महिन्यात राज्याच्या कानाकोपऱ्यात शेतकरी संपाचा विषय गेला. यादरम्यान विरोधी पक्ष, तसेच काही संघटनांनी शेतकरी प्रश्‍नांवर रान उठवले. कर्जमुक्‍ती, हमीभावाचा विषय अजेंड्‌यावर आणला. त्याचा परिपाक म्हणून 1 जून पासून सुरु झालेला संप परिणामकारक ठरत होता. आणखी दोन दिवस संप सुरु राहिला असता तर सरकारच्या नाड्या आवळल्या गेल्या असत्या, पण तत्पूर्वीच राज्याचा शेतकरी झोपेत असताना त्याच्या वर्मावर वार करणारा निर्णय मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी झाला. संपूर्ण कर्जमुक्‍ती, हमीभावाच्या मुख्य मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तरीही जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह पुणतांब्याच्या बहुतांश कमिटी मेंबर्सनी संप मागे घेण्याची भूमिका जाहीर केली. खरे तर शेतकऱ्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांना खूष करण्यासाठीचा हा निर्णय झाला. यातून शेतकऱ्यांना ठोस असे काहीच मिळाले नाही ! 

मुख्यमंत्री, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी नेते जयाजीराव यांना भरपूर काही मिळाले. मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चाप्रमाणे शेतकरी संपाचे आव्हान यशस्वीपणे पेलवले. खोत मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनले. राज्यमंत्री असताना त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका केली. कृषिमंत्री फुंडकर, पणनमंत्री देशमुख यांनी संपाला भिडण्याचे धाडस दाखवायला पाहिजे होते. मात्र हे नेते ठरवून मागे राहिले. थेट भाजपचा मंत्री टार्गेट झाला नाही. आंदोलकांना सदाभाऊ अंगावर घेत होते. जयाजीसारखा मोहरा त्यांनीच गळाला लावला आणि मिशन फत्ते केले. त्याचा परिणाम आगामी मंत्रिमंडळ विस्तारात दिसेलच ! जयाजीराव हे तर दीड दोन तालुक्‍याचे शेतकरी नेते. पुणतांबेकर बाजूला राहिले, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेजारची खुर्ची जयाजीरावांना दिली. जयाजीराव मुख्यमंत्र्यांच्या इतके जवळचे की, ते त्यांच्या कानात बोलले. शेतकऱ्यांचा कोणता प्रश्‍न कानात बोलून सोडवला, हे दोघांनाच माहीत? रिझल्ट काय तर, एका रात्रीत जयाजीराव राज्यातील शेतकऱ्यांचे नेते झाले! 

अंधारातील गोष्टींवर समाज बोट ठेवत असतो. वर्षा निवासस्थानी भरपूर लाईटस असल्यातरी तिथला निर्णय अंधारातच झाला, असे म्हणायला पाहिजे. कारण त्यावेळी सर्व महाराष्ट्र झोपलेला होता. तिथे पाच पंचवीस लोक जागे असतीलही, मात्र शेतकरी प्रतिनिधींच्या डोक्‍यात मात्र अंधार झाला होता. म्हणून त्यांनी सरकारच्या सोयीसाठी शेतकरी जागा होण्याच्या आत संपाची माती करुन टाकली. कारण शेतकरी जागे असतेतर हा निर्णय जाहीर करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. सकाळी ज्यावेळी त्यांना हे कळले त्यावेळी ते खवळून उठले. नाशिक, सांगलीत सदाभाऊंचे तर जयाजीरावांचे सोलापुरात पुतळे जाळण्यात आले. जयाजीरावांनी सबुरीने घेत शेतकऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला असता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते! 

मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची जबाबदारी कृषीमंत्री, पणनमंत्री अथवा नगरच्या पालकमंत्र्यांवर दिली नाही, यातच मोठी हुशारी होती. शेतकरी चळवळीचे सर्व दुवे माहीत असणाऱ्या सदाभाऊंना त्यांनी या मोहिमेवर पाठवले होते. सदाभाऊंनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे जयाजीरावांना हाताशी धरुन काम तमाम केले. संपाच्या दोन दिवस आधी सदाभाऊ पुणतांब्यात जातात, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होते. ती फिस्कटते. संप सुरु होतो. जयाजीराव चॅनेलवर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रश्‍नांवर पोटतिडकीने बोलतात. निकराच्या लढाईची भाषा करतात. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाताना परत पुणतांब्यात येऊन निर्णय सांगतो, असे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या अपरोक्ष सरकारच्या सोयीचे निर्णय घेऊन सदाभाऊंच्या शासकीय बंगल्यावर मुक्‍काम ठोकतात. हे कसे अचानक घडेल ? भांडे फुटल्यावर सकाळी त्यांना विचारले तर म्हणतात, फूटपाथवर झोपू काय? महत्त्वाची बाब म्हणजे सदाभाऊ- जयाजी ही जोडी मिडीयाला सांगते, आम्ही दोघे मित्र आहोत म्हणून. हे दोघे कुणाकुणाला मूर्ख समजतात, कुणास ठाऊक? 

सदाभाऊ संघर्षातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांना आंदोलनाचे शास्त्र माहीत नाहीत काय ? ज्यांच्यासाठी आंदोलन करतो, जिथे आंदोलन करतो, त्या लोकांना विश्‍वासात न घेता निर्णय घेतल्यानंतर काय होते, ते त्यांना चांगले माहीत आहे. कऱ्हाडचे ऊस आंदोलन राजू शेट्टींनी मागे घेतले तेव्हा कुणाचा तिळपापड झाला होता, हे सदाभाऊंना चांगले माहिती असणार ! ऊस आंदोलने प्रचंड आक्रमक झाली, मात्र चर्चेत काय झाले हे कार्यकर्त्यांना सांगूनच निर्णय व्हायचे. त्यामुळे साखरसम्राटांना झुकावे लागत होते. पण इथे सदाभाऊ वेगळ्या भूमिकेत होते. सरकारच्या शेतीविषयक कामगिरीची टिमकी वाजवायची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. म्हणून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असताना, संप होत असताना मुख्यंत्र्यांचा विशेष सत्कार फक्‍त तेच करु शकतात. जयाजीराव यांनीही मोठा धडा दिला आहे. इतरांनी सुरु केलेले आंदोलन कसे हायजॅक करायचे, त्यासाठी सरकारविरुद्ध कसे रणशिंग फुंकायचे आणि वेळ येताच सरकारच्या सोयीची वाजंत्री वाजवीत शेतकऱ्यांच्या तोंडी पाने कशी पुसायची, हे जयाजीरावांकडून शिकावे आणि अशा जयाजीरावांचा कसा वापर कसा करायचे हे सदाभाऊंकडून शिकावे! कोणी कुणाचा वापर केलाय हे यथावकाश समोर येईल. मात्र आताच जयाजीरावांना पश्‍चात्तापाची उपरती झालीय. सदाभाऊंना ती होईल कां, ते माहित नाही पण सदाभाऊ प्रामाणिक असते तर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा निरोप घेऊन ते पुणतांब्याला नक्‍की गेले असते ! 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com