'मुक्ताई'चा कौल मिळवत खडसे पुरुन उरले! 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगरातील नगरपंचायतीच्या प्रथमच झालेल्या निवडणुकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पारड्यात मतांचे दान टाकून त्यांच्याकडे एकहाती सत्ता सोपविली आहे. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार नजमा तडवी याही निवडून आल्याने खडसे विरोधकांना पुरून उरले आहेत.
'मुक्ताई'चा कौल मिळवत खडसे पुरुन उरले! 

भुसावळ (जळगाव): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगरातील नगरपंचायतीच्या प्रथमच झालेल्या निवडणुकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पारड्यात मतांचे दान टाकून त्यांच्याकडे एकहाती सत्ता सोपविली आहे. नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार नजमा तडवी याही निवडून आल्याने खडसे विरोधकांना पुरून उरले आहेत. आमिषांना झिडकारत मतदारांनी "नाथाभाऊं'वरील विश्‍वास सिद्ध केला. कॉंग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, तर शिवसेना-राष्ट्रवादी युतीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. 

मुक्ताईनगरातील विजयामुळे भुसावळ विभागातील (लोकसभेचा रावेर मतदारसंघ) सात पालिका भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. यावल आणि रावेर वगळता भुसावळ, जामनेर, फैजपूर, सावदा, वरणगाव, बोदवड आणि आता मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर छुप्या विरोधकांचा सामना करत एकनाथ खडसेंची संघर्षमय वाटचाल सुरू आहे. त्यामुळे भाजपचा गड असलेल्या मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून खडसेंच्या पराभवासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. त्यासाठी शिवसेनेने सुरवातीला महाआघाडी स्थापनेची व्यूहरचना केली; पण नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसने वेगळी चूल मांडली. पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरली. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती अभद्र असल्याचा शिक्कामोर्तब करण्यात खडसेंना यश आले आहे. 

खुंटलेला विकास, पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आदी मुद्‌द्‌यांवर विरोधी पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. परंतु खडसेंनी प्रचाराचा नारळ वाढविला त्याचवेळी भाजपच्या नगराध्यक्षाशिवाय पर्याय नाही, असे सांगून इतर टीका-टिप्पणी न करता शहर विकासाचा मुद्दा लोकांसमोर मांडला. रस्त्यांसाठी भरमसाठ निधी मंजूर करून आणण्यासह राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने पुढे विकासासाठी कोणतीही अडचण येणार नाही, हे पटवून दिले आणि मतदारांनी सत्तेचे माप त्यांच्या खिशात टाकले. 

या निवडणुकीत भाजपने सर्व 17 जागा लढविताना तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले. सामाजिक गणिते लक्षात घेऊन अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाच्या महिलेस उमेदवारी दिल्याने अर्धी लढाई आधीच जिंकली होती, असे म्हटले जाते. नजमा तडवी भाजपच्या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार असल्या, तरी खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com