पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव चारा गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना झारखंडमधील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील (रीम्स) वॉर्डमध्ये ठेवण्याऐवजी रुग्णालय संचालकांच्या बंगल्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने प्रशासनासह लालूंना फटकारले आहे.
लालूप्रसाद यादव यांनी कारागृहातून भाजपच्या आमदाराला दूरध्वनी करून बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले होते. कारागृहाचे नियम धुडकावून लालूंना मोबाईल फोन व अन्य सुविधा कशा मिळाल्या, याबाबत न्यायाधीश अपरेशकुमार सिंह यांनी विचारणा केली. यावर कारागृह प्रशासन म्हणाले की, लालूप्रसाद यांना कारागृहाऐवजी रुग्णालय संचालकांच्या बंगल्यात ठेवण्यात आले होते. अशा स्थलांतरात कैद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल नियमावलीत काहीही नमूद केलेले नाही.
लालूप्रसाद यांना बंगल्यात का ठेवण्यात आले, असा सवालही न्यायालयाने केला. कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे यादव यांची रवानगी रीम्समधून रुग्णालय संचालकांच्या बंगल्यात करावी, लागली, असे तुरुंग महानिरीक्षकांनी सांगितले. यावर न्यायालयाने सरकार कायद्याने चालते आणि ते एका व्यक्तीमुळे चालत नाही, असे फटकारले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २२ रोजी होणार आहे.
दरम्यान, लालूप्रसाद यांची प्रकृती चिंतानजक आहे. कोणत्याही क्षणी त्यांची तब्येत आणखी ढासळू शकते, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. लालू हे सध्या शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रीम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
लालूंच्या प्रकृतीबद्दल त्यांच्यावर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.
लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. रीम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले आहे.
चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील सुनावणी 21 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.