लालूप्रसाद यांच्यासह  सोळा आरोपी दोषी 

लालूप्रसाद यांच्यासह  सोळा आरोपी दोषी 

रांची, ता. 23 : पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यासह सोळा आरोपींना दोषी ठरविले.

या प्रकरणी आरोपी असलेले माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्र, माजी पशुपालन मंत्री विद्यासागर निषाद यांच्यासह सहा जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. दोषी ठरलेल्यांच्या शिक्षेबाबत तीन जानेवारीला सुनावणी होणार आहे. 


नव्वदच्या दशकामध्ये देशभर गाजलेल्या पशुखाद्य गैरव्यवहाराच्या आजच्या सुनावणीबाबत सर्वत्र उत्सुकता होती. प्रमुख आरोपींमध्ये लालूप्रसाद यांचे नाव असल्याने न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी आज दुपारी सुनावणीवेळी सर्व बावीस आरोपींना बोलावून घेत त्यातील सहा जणांना दोषमुक्त केले.

लालूप्रसाद यांच्यासह दोषी ठरविलेल्या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी रांचीमधील बिरसा मुंडा मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली आहे. चारा गैरव्यवहाराच्या आणखी एका प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ऑक्‍टोबर 2013 मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून याप्रकरणी ते जामिनावर आहेत. 


याप्रकरणी 27 ऑक्‍टोबर 1997 मध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर निकाल लागला आहे. आरोपपत्र दाखल केलेल्या 38 जणांपैकी अकरा जणांचे दरम्यानच्या काळात निधन झाले, तीन जण माफीचे साक्षीदार बनले, तर दोन जणांनी गुन्हा मान्य केल्याने त्यांना 2006मध्ये शिक्षा झाली होती. आज सुनावणी झालेल्या प्रकरणात आरोपींवर 1991 ते 1994 या कालावधीत झारखंडच्या देवघर ट्रेझरीमधून 89.27 लाख रुपये बेकायदा पद्धतीने काढल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा कट करणे आणि बेकायदा पैसे काढणाऱ्यांना संरक्षण देणे असे आरोप लालूप्रसाद यांच्यावर आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोषींना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. 

निकालाला आव्हान देणार 
सीबीआय न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे राजदचे वरीष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी आज सांगितले. न्यायालयीन लढा सुरु ठेवण्याबरोबरच जनतेच्या मदतीने राजकीय लढाही लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


शक्तिशाली लोक आणि शक्तिशाली वर्गाने नेहमीच समाजात फुट पाडून वर्चस्व गाजविले आहे. खालच्या समजलेल्या गेलेल्या वर्गातील कोणी या अन्याय्य उतरंडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्याला शिक्षा करण्यात आली आहे. 
- लालूप्रसाद यादव, राजद नेते 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com