मराठवाड्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघातील यशामुळे लोणीकरांचे मंत्रिपद वाचले ...

 मराठवाड्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघातील यशामुळे लोणीकरांचे मंत्रिपद वाचले ...

परतूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करतांना अनेक विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. पण वगळण्यात येणाऱ्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत असलेले स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना मात्र अभय मिळाले आहे. मंत्रीमंडळ विस्ताराची जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा बनबराव लोणीकरांचे मंत्रीपद जाणार, त्यांच्या कामावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत असे बोलले जायचे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना, परभणी आणि ज्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपद लोणीकरांकडे होते, त्या तीनही मतदारसंघात युतीचे उमेदवार विजयी झाले. मराठवाड्यातील या तीन मतदारसंघातील यशामुळेच लोणीकरांचे मंत्रिपद वाचल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे. राजकीयदृष्ट्या जालना जिल्ह्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्षपदापासून राज्यातील एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपद देखील आहे. तर बबनराव लोणीकर यांच्याकडे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी आहे. या शिवाय शिवसेनेचे अर्जून खोतकर हे देखील राज्यमंत्री आहेत. 

एकाच जिल्ह्यात तीन मंत्रीपद असल्यामुळे कुरघोडीचे राजकारण देखील इथे मोठ्या प्रमाणात पहायला मिळाले. दानवे-लोणीकर यांच्यातील सख्य सर्वांनाच माहित आहे. तर मध्यंतरी दानवे विरुध्द खोतकर वादाला देखील पक्षातील बड्या नेत्याने हवा दिल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा व्हायची तेव्हा डच्चू देणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत बबनराव लोणीकर यांचे नाव हमखास घेतले जायचे. 

सतत दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्या सारख्या भागातील मंत्री असून देखील लोणीकरांचे काम समाधानकारक नाही, पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत अशा वावड्या उठवल्या जायच्या. अनेक मुहूर्त टळल्यानंतर अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार झाला. यावेळी बबनराव लोणीकर हजर होते. विशेष म्हणजे डच्चू दिलेल्या मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे लोणीकरांना डच्चू मिळणार या अफवाच ठरल्या. 

अशोक चव्हाणांच्या पराभवाची किमया 
पाणीपुरवठा मंत्री म्हणून राज्यातील पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी बबनराव लोणीकर राज्यपातळीवर काम करत असतांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर नांदेडचे प्रभारीपद सोपवण्यात आले होते. मोदी लाटेत विजय मिळवत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला गड राखला होता. या गडाला धक्का देण्याची जबाबदारी यावेळी लोणीकरांवर सोपवली होती. हे करत असतांनाच जालना व परभणी या दोन मतदरासंघातील त्यांच्या कामगिरीवर देखील पक्ष नेतृत्वाचे लक्ष होते. 

अशोक चव्हाण यांच्या विरोधात प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक वर्षांनी नांदेडमध्ये भाजपला विजय मिळवता आला. अर्थात या यशात लोणीकरांचा देखील महत्वाचा वाटा होता. प्रभारी म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका नांदेडच्या विजयात नजरेस भरणारी ठरली. तिकडे परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी देखील लोणीकर पिता-पुत्रांनी शक्ती पणाला लावली. 

शिवसेनेचे संजय जाधव डेंजर झोनमध्ये आहेत, ते पराभूत होणार असे अंदाज एक्‍झीटपोलने वर्तवले होते. मात्र निकालानंतर ते फोल ठरले. स्थानिक शिवसेना आमदारानेच विरोधात काम केल्याचा आरोप होत असतांना लोणीकरांनी आपले चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्यासह भाजपची संपुर्ण टीम जाधवांच्या पाठीशी उभी केली होती. परिणामी जाधव यांना परतूर विधानसभा मतदारसंघातून 17 हजारांची लीड तर मिळालीच, पण ते विजयी देखील झाले. 

परभणीप्रमाणेच जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी देखील लोणीकरांच्या खांद्यावर होती. आजारपणामुळे रावसाहेब दानवे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना प्रचार देखील करता आला नाही. अशावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावण्यासोबतच शिवसैनिकांना देखील आपलेसे करून घेत दानवेंना विजयी करण्याची कसरत लोणीकरांनी यशस्वीपणे पार पाडली. याशिवाय मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, जिल्ह्यातील विविध विकासकामे व मतदारसंघातील दिंडी मार्ग या गोष्टी लोणीकरांसाठी जमेच्या ठरल्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com