सोलापूर जिल्हा कॉंग्रेसकडे  इच्छुकांची भाऊगर्दी; शहरातील मतदारसंघाबाबत मात्र अनास्था 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघातून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, शहरातील मतदारसंघाबाबत मात्र अनास्था दिसून येत आहे. शहरातून आतापर्यंत फक्त एकाच इच्छुकाने अर्ज नेला असून, जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातून सात जणांनी अर्ज नेले आहेत.
सोलापूर जिल्हा कॉंग्रेसकडे  इच्छुकांची भाऊगर्दी; शहरातील मतदारसंघाबाबत मात्र अनास्था 

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघातून इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, शहरातील मतदारसंघाबाबत मात्र अनास्था दिसून येत आहे. शहरातून आतापर्यंत फक्त एकाच इच्छुकाने अर्ज नेला असून, जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातून सात जणांनी अर्ज नेले आहेत. 

विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी 6 जुलैपर्यंत आपले अर्ज शहर व जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन प्रदेश कॉंग्रेस समितीने केले आहे. 

त्यानुसार सोलापूर शहर उत्तर मतदारसंघासाठी प्रदेश प्रतिनिधी राजन कामत यांनी अर्ज नेला आहे. तर जिल्हा कॉंग्रेस कार्यालयातून रावसाहेब व्हनमाने (दक्षिण सोलापूर), शिवाजी काळुंगे (पंढरपूर), रमजान पठाण व विजय साळुंके (बार्शी), धर्मराज राठोड (अक्कलकोट), गौरव खरात व किशोर पवार (मोहोळ) यांचा समावेश आहे. याशिवाय, बार्शी मतदारसंघातून आणखी दोन जण इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. 

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, भारत भालके व सिद्धाराम म्हेत्रे यांनी अद्याप आपले अर्ज नेले नाहीत. तथापि ते थेट प्रदेश समितीकडे आपल्या उमेदवारीची मागणी करतील, अशी चर्चा आहे. 

शहर उत्तर मतदारसंघातून शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह, सुनील रसाळे, सुदीप चाकोते आणि महादेव चाकोते हेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर मध्य मतदारसंघातून माजी महापौर यू. एन. बेरिया आणि नगरसेवक रियाज हुंडेकरी मागणी करू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेली मते पाहता उमेदवारीसाठी ओढा नसल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर शहर कार्यालयातून इच्छुकांनी अर्ज नेले नसले तरी, जे इच्छुक आहेत ते थेट प्रदेश समितीकडे उमेदवारी मागण्याचा अर्ज दाखल करतील. 6 जुलैपर्यंत मुदत आहे. या कालावधीत आणखीन अर्ज दाखल होतील. 
- प्रकाश वाले, शहराध्यक्ष सोलापूर शहर कॉंग्रेस समिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com