केजमधून नमिता मुंदडासाठी सासरे व पती अक्षय यांची जोरदार तयारी

विमल मुंदडा राज्याच्या आरोग्यमंत्री असतांना रुग्णांना स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेणारे नंदकिशोर मुंदडा अनेकांनी पाहिले आहेत. सत्ता असो किंवा नसो लोकांशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही हीच त्यांची बलस्थाने समजली जातात. याच जोरावर आपली सून नमिता हिला आमदारकीच्या खुर्चीत पाहण्याचे स्वप्न नंदकिशोर मुंदडा बाळगून आहेत. दोन वेळा भाजपकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या स्व. विमल मुंदडांनी पुढे पक्षात दुय्यम स्थान मिळू लागल्याने 1998 मध्ये कॉंग्रेसमध्ये आणि काही महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
केजमधून नमिता मुंदडासाठी सासरे व पती अक्षय यांची जोरदार तयारी

केज : विजयी मतांचा चढता आलेख आणि सलग पाच वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्याने राष्ट्रवादीच्या आमदार दिवंगत विमल मुंदडांचे आणि केज मतदार संघाचे अतुट नाते निर्माण झाले होते. पण 2014 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या सुनबाई नमिता मुंदडा यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला. 

आगामी विधानसभा निवडणुकीत या पराभवाचे उट्टे काढून केज मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी नमिता मुंदडा, त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा व समर्थक कामाला लागले आहेत. "अबकी बार नमिता मुंदडाच आमदार' अशा घोषणा जाहीर कार्यक्रमातून आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून घुमू लागल्याने केज मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्‍यर्ता वर्तवली जात आहे. 

केज या राखीव मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करत असतानाच स्व. डॉ. विमल मुंदडा यांनी दोनदा मंत्रिमंडळात विविध खात्याची जबाबदारी सांभाळत राज्यात आपली छाप पाडली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातील नेत्यापैकी एक म्हणून त्यांची गणना केली जायची. त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा, पायाभरणी करणारे पती नंदकिशोर मुंदडा, मतदारसंघाची देखरेख, कार्यकर्त्यांची कामे या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहेत. 

विमल मुंदडा राज्याच्या आरोग्यमंत्री असतांना रुग्णांना स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेणारे नंदकिशोर मुंदडा अनेकांनी पाहिले आहेत. सत्ता असो किंवा नसो लोकांशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही हीच त्यांची बलस्थाने समजली जातात. याच जोरावर आपली सून नमिता हिला आमदारकीच्या खुर्चीत पाहण्याचे स्वप्न नंदकिशोर मुंदडा बाळगून आहेत. दोन वेळा भाजपकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या स्व. विमल मुंदडांनी पुढे पक्षात दुय्यम स्थान मिळू लागल्याने 1998 मध्ये कॉंग्रेसमध्ये आणि काही महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 

केज हा वंजारा बहुल मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना विजय मिळणे अवघड असल्याची गणिते मांडली गेली. पण ती चुकीची ठरवत त्या विजयी झाल्या. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीचे रोमन साठे विजयी झाले. दरम्यान, साठे यांच्या विजयासाठी झटणारे अक्षय मुंदडा आणि निवडणूक यंत्रणेपासून अलिप्त राहिलेले नंदकिशोर मुंदडा राष्ट्रवादीपासून काहीसे दुरावले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. पण दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतरची सहानुभूती आणि मोदी लाटेमुळे नमिता मुंदडांचा पराभव झाला. पत्नीच्या पराभवाने अक्षय मुंदडा जमिनीवर आले आणि सासरे नंदकिशोर मुंदडा देखील पुन्हा सक्रीय झाले. 

मतदार संघात 1978 पासून सामाजिक कामांच्या माध्यमातून सक्रीय असलेल्या नंदकिशोर मुंदडांना मतदार संघाची नस चांगलीच माहित आहे. आपले राजकीय चातुर्य, डावपेच, मेहनत, कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची वृत्ती, कायम जनसंपर्क, अधिकाऱ्यांशी संवाद याच बळावर नंदकिशोर मुंदडांनी अल्पसंख्यांक असतानाही पत्नी दिवंगत विमल मुंदडांना वैद्यकीय क्षेत्रातून थेट राजकीय क्षेत्रात आणले. एवढेच नाही तर सलग पाचवेळा निवडून आणत विक्रमही केला. नंदकिशोर मुदंडा यांनी आता कात टाकून नव्याने सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. पुत्र अक्षय मुंदडासह मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक, लग्न, वाढदिवस, सार्वजनिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या सुख दुःखात नंदकिशार मुंदडा सहभागी होत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारल्याचे चित्र आहे. 

नमितांमध्ये सासूबाईंची छबी 
दिवंगत विमल मुंदडा या वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर पदवीधारक (एमबीबीएस, गायनॅकॉलॉजीस्ट) होत्या. उच्चशिक्षीत असल्या तरी सामान्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण वाखणण्याजोगा होता. हेच गुण त्यांच्या सूनबाईंमध्ये दिसून येतात. नमिता मुंदडा या मुंबई विद्यापीठाच्या वास्तूशास्त्र शाखेच्या पदवीधर आहेत. सासू-सुनेच्या स्वाभावातील हे साधर्म्य दाखवण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून सासू-सुनेचे एकत्रित छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहे. 

राष्ट्रवादीपासून दुरावा 
मात्र मुंदडांच्या घरातून राष्ट्रवादीचा झेंडा दुर झाला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळलेल्या मुंदडा पिता-पुत्रांनी अलिकडे स्वतंत्र मोट बांधत डॉ. विमल मुंदडा विचार मंच आणि अक्षय मुंदडा विचार मंचच्या माध्यमातून आपले राजकारण सुरु ठेवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंदडा कुटुंब कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात याकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com