राणेंच्या भाजप प्रवेशाने मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या साम्राज्याला हादरा बसेल ? 

narayan rane @bmc
narayan rane @bmc

मुंबई    : कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांच्याबरोबर मुंबईतील काही काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास मुंबई महापालिकेत  शिवसेनेच्या साम्राज्याला हादरा बसेल काय याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे . 

नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपला काय लाभ होणार असा  प्रश्न  भाजपमधीलच एका गटाकडून उपस्थित केला जात आहे .  महाराष्ट्र विधानसभेत  भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय सरकार चालवता येईल इतके काँग्रेसचे आमदार फोडून आणणे आजच्या घटकेला नारायण राणे यांना शक्य दिसत नाही . भाजप प्रवेशासाठी  काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा दोन वर्षासाठी निवडणूक लढवायला फारसे आमदार तयार नाहीत . निवडणुकीच्या तोंडावर असे पक्षांतर करणारे अनेक आमदार तयार होतील पण आज नाही . 

पण शिवसेनेला वेठीस धरण्यासाठी  मुंबई महापालिकेत स्वतःचे संख्याबळ अधिक करण्याची संधी भाजप नारायण राणे यांच्या मदतीने योग्य वेळी साधू  शकते . मुंबई महापालिकेत   शिवसेनेचे  अपक्षांसह संख्याबळ   88 आहे तर  भाजपचे संख्याबळ  अपक्षांसह  84 असे आहे .

महापालिकेत कॉंग्रेसचे 30 नगरसेवक आहेत. त्यामुळे 20 नगरसेवकांनी कॉंग्रेसपासून वेगळे होऊन स्वत:चा गट स्थापन केल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होण्याची शक्‍यता नाही. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक फुटण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे राणे यांच्यासोबत जाणाऱ्या नगरसेवकांना फेर निवडणुकीला समोरे जावे लागेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

नारायण  राणे  यांच्याबरोबर दहा ते बारा नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास त्यांना पुन्हा निवडणूक लढवून जिंकून यावे लागेल. त्यापैकी निम्मे नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनेची पाचावर धारण बसू शकते. शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळात अवघ्या चार नगरसेवकांचा फरक आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून आलेले सहा नगरसेवक निवडून आले तरी शिवसेनेच्या सत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. 

नारायण राणेंच्या  मदतीने  भाजपने ठरवले तर महापौर पदापासून सर्वच समित्या भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र  महापालिकेत प्रत्यक्ष सत्तांतर न करताही भाजप शिवसेनेवर टांगती तलवार ठेवण्याचा आनंद घेऊ शकते . किंवा शिवसेना विधानसभेत डोईजड होऊ लागताच  भाजप मुंबई महापालिकेचा विषय ऐरणीवर आणून दडपण निर्माण करू शकते . शिवसेनेसाठी आता मुंबई महापालिका किती महत्वाची आहे हे सर्वच जण जाणतात . 

राणे भाजपमध्ये गेल्यास मुंबई महापालिकेतील त्या पक्षाची ताकद वाढण्याची शक्‍यता आहे. नायगाव येथील सुप्रिया मोरे आणि गोवंडी येथील विठ्ठल लोकरे हे कॉंग्रेसमधील राणे समर्थक नगरसेवक मानले जातात. तर इतर सहा नगरसेवक राणे यांच्या संपर्कात असल्याचे मानले जाते. नारायण राणे नगरसेवकांचा आकडा आणखी वाढवू शकतात असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे . 
त्यामुळे भाजप नारायण राणेबाबत काय निर्णय घेते याकडे काँग्रेसपेक्षाही शिवसेनेचे लक्ष अधिक लागणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com