निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळींचे गावोगाव श्रमदान

निवडणुकीच्या तोंडावर नेतेमंडळींचे गावोगाव श्रमदान

कळमनुरी : यंदाचे वर्ष हे निवडणूकपूर्व वर्ष असल्याने राजकीय नेत्यांमध्ये अचानक श्रमदानाची आवड निर्माण झाली आहे. नांदेड, परभणी व हिंगोली तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभराच्या काळातील टंचाई निवारणाच्या बातम्यांकडे बारकाईने पाहिल्यास ही बाब लक्षात येते. पाणी फाउंडेशन सारख्या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात श्रमदान व साहित्य वाटप करण्याची जणू स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. 

कळमनुरी हा पूर्वीचा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. माकपचे विठ्ठलराव नाईक यांनी याचे चारवेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर ऐंशीच्या दशकात कॉंग्रेसच्या रजनी सातव यांनी कॉंग्रेसचा झेंडा रोवत कम्युनिस्टांचे आव्हान मोडून काढले होते. त्यानंतर श्रीमती सातव यांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून कॉंग्रेसची विचारधारा पक्की करून ठेवली आहे. एकोणीसशे नव्वदच्या काळात या मतदारसंघात कॉंग्रेसविरुद्ध शिवसेना असा सत्तासंघर्ष होता. तेंव्हापासून आजतागायत या मतदारसंघात दोन वेळेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अपवाद वगळता कॉंग्रेसविरुद्ध शिवसेना अशाच लढती रंगल्या आहेत. 

कॉंग्रेसचे डॉ. संतोष टारफे हे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेकडून संतोष बांगर इच्छुक आहेत. भाजपकडून माजी आमदार गजानन घुगे प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार रामराव वडकुते व डॉ. जयदीप देशमुख यांनीही आपली दावेदारी केली आहे. या संभाव्य इच्छुकांनी मतदारसंघात प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. त्यातच त्यांना पाणी फाउंडेशनचे निमित्त मिळाले आहे. या माध्यमातून त्यांनी आता श्रमदान करण्याबरोबरच गावकऱ्यांना श्रमदान करताना लागणारे साहित्य वाटप करीत संपर्क चालविला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे, परभणी जिल्ह्यात जिंतूर सेलू मतदारसंघात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या मेघना साकोरे- बोर्डीकर (पाणी फाऊंडेशन), पाथरी मतदारसंघात माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या सूनबाई प्रेरणा वरपूडकर (महिला आरोग्य शिबिरे), जिंतूर सेलूमधूनच शिवसेनेचे कार्यकर्ते राम पाटील आदी राजकीय नेते गाळ काढणे व इतर कामांद्वारे आपला जनसंपर्क वाढवत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com