कर्नाटकात ऑपरेशन कमळ : कॉंग्रेसचे 11 असंतुष्ट आमदार मुंबईत !

भाजपकडून कॉंग्रेस आमदारांना 30 ते 40 कोटी रुपयाचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केला.
Kumarswamy-Yediyurappa
Kumarswamy-Yediyurappa

बंगळूर  : कर्नाटकातील कॉंग्रेसचे 11 आमदार मुंबईतील खासगी हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारसमोर नवे संकट उभे राहिले आहे. 

माजी मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांचे पुत्र विजयेंद्र असंतुष्ट आमदारांसोबत असल्याचे समजते. एकीकडे भाजपच्या ऑपरेशन कमळने जोर धरलेला असतानाच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्पाच्या तयारी बरोबरच ऑपरेशन कमळच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली आहे. 

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 विधीमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिलेल्यांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरविता येत नसल्याची चर्चा आहे. विधानसभेत सरकारविरुध्द मतदान केल्यास त्यांना अपात्र ठरविण्यात येते, असे समजते. सध्या कॉंग्रेसचे 11 आमदार मुंबईत आहेत. उद्याच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आणखी पाच आमदार मुंबईला जाणार असल्याचे वृत्त आहे.


अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही असंतुष्ट आमदार विधानसभेच्या कामकाजापासून दूर राहिले. त्यामुळे युती सरकारची चिंता वाढली आहे. अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उद्या (ता. 8) सन 2019-20 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत . 

कर्नाटकात राजकीय घडामोडींना जोर आला असून राजकीय अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना उद्या कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी द्यावयाची नाही, असा निर्धार भाजपने केला आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी 8 ते 10 आमदारांनी राजीनामा द्यावा, यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.

असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह आमदार डॉ. उमेश जाधव, महेश कुमठळ्ळी, बी. नागेंद्र, जे. एन. गणेश आजही विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिल्यांने भाजपच्या ऑपरेशन कमळला पुन्हा जोर आला आहे.


भाजपकडून कॉंग्रेस आमदारांना 30 ते 40 कोटी रुपयाचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.

विधिमंडळाबाहेर असलेले सर्व आमदार आज सायंकाळपर्यंत परत येतील असे सांगून सिध्दरामय्या म्हणाले, "गेल्या काही महिन्यापासून भाजपचा ऑपरेशन कमळचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे 20 आमदारांना प्रत्येकी 30 ते 40 कोटी रुपये देण्याचे आमीष दाखविले आहे. भाजपकडे एवढा पैसा आला कोठून?"

आमदारांना आमीष दाखविल्याचा आपल्याजवळ पुरावा असल्याचे सांगून वेळ येताच तो जाहीर करण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. युती सरकार भक्कम असून कार्यकाल पूर्ण करेल. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कोणती कारवाई करता येते, याचा अभ्यास करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

उद्या (ता. 8) कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. बैठकीत भाग घेण्यासाठी पक्षाचे सर्व आमदार आज सायंकाळपर्यंत बंगळुरात परततील. बैठकीला उपस्थित न रहाणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येईल, असा त्यांनी यावेळी इशारा दिला. भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्याजवळ आमदारांची संख्या अधिक असेल, तर त्यांनी सरकारविरुध्द अविश्वास आणावा. खोटे बोलून ते जनतेची फसवणूक करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com