राष्ट्रीय महामार्गांच्या भुमीपुजनातून चिखलीकरांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग !

राष्ट्रीय महामार्गांच्या भुमीपुजनातून चिखलीकरांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग !

कंधार : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकाराने लोहा येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन राष्ट्रीय महामार्गांचे भुमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमातून आमदार चिखलीकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग तर फुंकले. तसेच विरोधकांसमोर आव्हानही उभे केल्याचे मानले जाते. 

शिवसेनेचे आमदार असतानाही नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार निवडीपासून प्रचाराची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार चिखलीकरांवर सोपविली होती. चिखलीकरांच्या भाजपशी जवळीकीची चर्चा आजही जिल्ह्यात चवीने चर्चिली जाते. चिखलीकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोहा-कंधार विधानसभा लढवली होती. मोदी लाट असूनही त्यांनी मतदारसंघावर भगवा फडकाविला होता. 

नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेच्या मेळावे, कार्यक्रमापासून अंतर ठेवणे सुरू केले. सुरवातीला अंतर ठेवून वागणाऱ्या चिखलीकरांनी नंतर नंतर उघडपणे भाजपचे काम करणे सुरू केले. आज ते नावाने शिवसेनेचे आमदार आहेत, कृतीने नव्हे. चिखलीकर शिवसेना सोडायचा प्रयत्न का करताहेत हा संशोधनाचा विषय आहे. 
लोहा-कंधार मतदारसंघ एकेकाळी "शेकाप'चा बालेकिल्ला होता.  या पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. पुढे या मतदारसंघाचीही राजकीय समीकरणे बदलली. 2014 मध्ये चिखलीकरांनी भाजपच्या ऍड. मुक्तेश्वर धोंडगे आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेंचा पराभव करून विजय संपादन केला. निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबत दुमत नाही. म्हणूनच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी ऍड. धोंडगे यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. चिखलीकरांच्या पक्षबदलावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न त्यांचे प्रतिस्पर्धी करत आहेत. 

एक तीर मे दो निशाण... 
शिवसेना सोडून भाजपचे काम करणे साधी बाब नाही. आरोप होतील, या आरोपातील तीव्रता कमी करण्यासाठी चिखलीकरांनी सरकारच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. लोहा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या भुमिपूजनासाठी दोनशे कोटी मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी माजी आमदार शंकरअण्णा आणि ऍड. धोंडगे यांच्यावर आघाडी घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com