शिवसैनिकांकडून राहुल गांधीना पुस्तक भेट; विलेपार्ले येथून स्पीडपोस्टने पाठवली पुस्तके

शिवसैनिकांकडून राहुल गांधीना पुस्तक भेट; विलेपार्ले येथून स्पीडपोस्टने पाठवली पुस्तके

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना व्हावी, यासाठी विलेपार्ले येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे आणि त्यांच्या सहकार्यांनी माझी जन्मठेप आणि इतर पुस्तके स्पीड पोस्टने पाठवली आहेत. विलेपार्ले येथील पोस्टात जाऊन राहुल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर ही पुस्तके पाठवली आहेत. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार असताना राहूल गांधी यांनी झारखंड विधानसभेच्या प्रचारावेळी सावरकरांविषयी केलेले विधानाने वादळ निर्माण केले. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी देशभरातून होत असतानाच शिवसेनेकडूनही संजय राऊत यांनी त्यांना खडे बोल सुनावले. माझे नाव राहुल गांधी आहे. राहुल सावरकर नाही. त्यामुळे माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. राहुल यांचे हे विधान सावरकरांचा अपमान करणारे असल्याचे म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

राहुल गांधीना सावरकर यांचे विचार, त्याग, देशभक्ती समजावी यासाठी सावरकरांचे माझी जन्मठेप हे पुस्तक सोमवारी सकाळी स्पीड पोस्टने विलेपार्ले येथील पोस्ट कार्यालयातून पाठवल्याचे जितेंद्र जानावळे यांनी सांगितले. हे पुस्तके राहुल गांधी यांनी वाचल्यास त्यांना नक्कीच सावरकरांची महती समजेल आणि यापुढे ते सावरकरांबद्धल बेताल वक्तव्य करणार नाहीत, असा टोलादेखील त्यांनी लगावला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे तेज, त्याग आणि धाडस. हे गुण अंगी नसलेल्या राहुल गांधींनी सावरकरांबद्दल बोलणे म्हणजे बालिशपणा असल्याची टीका जानावळे यांनी यावेळी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com