भाजपच्या 'कॉंग्रेस-मुक्त भारत' मोहिमेला संघाचा ' रेड सिग्नल'? 

राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एकाच्या कर्तृत्वाचे फळ नसते. आम्हाला सगळा समाज संघटित करायचा आहे. मुक्त'ची भाषा राजकारणात चालते. आम्ही संघामध्ये ती मुळीच करत नाही.-डॉ. मोहन भागवत
narendra_modi_mohan_bhagwat
narendra_modi_mohan_bhagwat

पुणे :  भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेल्या 'कॉंग्रेस-मुक्त भारता'च्या मोहिमेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी 'रेड सिग्नल' दाखविला.

''कॉंग्रेस-मुक्त भारता'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही. राष्ट्रबांधणीच्या कार्यात आमचे विरोधकही आमचे सहप्रवासी आहेत,'' अशा शब्दांत भागवत यांनी लोकशाहीतील विरोधी पक्षाच्या अस्तित्वाला महत्त्व दिले, तर सत्ताधारी भाजपलाही कानपिचक्‍या दिल्या.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 'कॉंग्रेस-मुक्त भारत' निर्माण करण्याची घोषणा केली. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ही मोहीम हाती घेतली होती. लोकसभेपाठोपाठ  गेल्या चार वर्षात विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये या मोहिमेला यश मिळाले. सध्या कॉंग्रेसकडे तीन तर भाजपकडे 22 राज्यांमध्ये थेट किंवा स्थानिक पक्षाशी युतीद्वारे सत्ता आहे.

कॉंग्रेसकडे असलेल्या तीनपैकी कर्नाटक राज्यामध्ये 12 मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. कर्नाटक पाठोपाठ, पश्‍चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुका होत आहेत. तर पुढील वर्षाच्या सुरवातीलाच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्येही "कॉंग्रेस-मुक्त'चाच नारा भाजपने दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. 

"राष्ट्राच्या उभारणीसाठी चाललेल्या प्रयत्नांची दिशा ही सर्वसमावेशक असली पाहिजे. राष्ट्रबांधणीचे काम हे कोणा एकाच्या कर्तृत्वाचे फळ नसते. आम्हाला सगळा समाज संघटित करायचा आहे. मुक्त'ची भाषा राजकारणात चालते. आम्ही संघामध्ये ती मूळीच करत नाही,'' असे मत भागवत यांनी व्यक्त केले.

मोदी यांच्या 'एकाधिकारशाही' कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले पक्षांतर्गत विरोधकांसह अन्य पक्षातील विरोधकांना भागवत यांच्या या वक्तव्यामुळे बळ मिळणार आहे. 

रा.स्व.संघाने सक्रीयता दाखविली नाही, तर निवडणुकीत भाजपचा पराभव होतो असे म्हटले जाते. 2004 च्या निवडणुकांमध्येही संघाने भाजपला पूरक सक्रीयता न दाखविल्यामुळे पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये संघाची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळेच सरसंघचालकांनी दिलेला "सर्वसमावेशकते'चा सल्ला भाजप कितपत गांभीर्याने घेईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com