राष्ट्रवादीतच हलकल्लोळ, दुसऱ्यावर हल्लाबोल कसला करता? 

दिग्गज नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा आज सांगलीत पोहोचली आहे. दरम्यान, काल रात्रीच तासगावात भाजपने राष्ट्रवादीवर प्रत्यक्ष हल्ला करून कार्यकर्त्यांना चोपल्यामुळे "हल्लाबोल' पेक्षा हल्ल्यातून झालेल्या राड्यावरच बोलण्याची वेळ अजितदादांसह प्रदेशाध्यक्ष तटकरेंवर आली.
राष्ट्रवादीतच हलकल्लोळ, दुसऱ्यावर हल्लाबोल कसला करता? 

सांगली : सांगली जिल्ह्यात एककाळ राष्ट्रवादीचा सुवर्णकाळ होता, आता उरलेल्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी फक्‍त इतिहास उरला आहे. इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ हे दोन विधानसभा मतदार संघ सोडले तर या पक्षाकडे आमदार नाहीत. वाळवा, शिराळ्यात संस्थात्मक ताकद बरी आहे.

या पार्श्‍वभूमीवर दिग्गज नेत्यांना घेऊन राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा आज सांगलीत पोहोचली आहे. दरम्यान, काल रात्रीच तासगावात भाजपने राष्ट्रवादीवर प्रत्यक्ष हल्ला करून कार्यकर्त्यांना चोपल्यामुळे "हल्लाबोल' पेक्षा हल्ल्यातून झालेल्या राड्यावरच बोलण्याची वेळ अजितदादांसह प्रदेशाध्यक्ष तटकरेंवर आली. 

अर्थात हल्ला करणारे त्यांच्याच पक्षाचे एकेकाळचे नेते असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. अर्थात यापूर्वीचा मारामाऱ्यांचा हा खेळ कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा होता, त्यात कॉंग्रेसच्या जागी आता भाजप अवतरले आहे, एवढेच. पण राष्ट्रवादीपुढे खरे आव्हान आहे ते अंतर्गत धुसफूस, गटबाजी आणि हल्ले कसे थांबवायची आणि संघटनेसाठी नवे शिलेदार कोठून आणायचे याचेच. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा आज आटपाडीतून सुरू झाली. येथील राजेंद्रअण्णा देशमुख आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विरोधकांवर हल्लाबोल करणार म्हणजे जुन्याच आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून काय बोलणार? येथेही पक्ष सक्षम नाही. त्यानंतर जतमध्ये सभा घेऊन सांगलीत हल्लाबोल होणार आहे.

मात्र जतमध्येही राष्ट्रवादी बॅकफुटवर गेली आहे. येथील नगरपालिकेतील सत्ताही नुकतीच गमवावी लागली आहे. आमदारकी भाजपकडे आहे. कालच येथे हल्लबोल तयारीसाठी आयोजित बैठकीतही कार्यकर्त्यांनी एकमेकांवरच कपडे फाडेतोपर्यंत हल्लाबोल करून ट्रेलरच दाखविला. त्यानंतर राष्ट्रवादीची सभा मिरजेत व सांगलीत आहे. 

मिरज तालुक्‍यातही राष्ट्रवादीची अवस्था केवीलवाणीच आहे. जयंतरावांचे मेव्हणे मनोज शिंदे वगळता वलय असलेला नेता नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ताकदही कमजोर आहे.

येथे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्याशी राष्ट्रवादीला दोन हात करावे लागतात. पण विधानसभेला येथे कॉंग्रेसलाच उमेदवारी द्यावी लागते त्यामुळे राष्ट्रवादीला येथे वाढीसाठी मर्यादा आहेत. 

महापालिकेत मिरज शहर आहे. मात्र येथेही राष्ट्रवादी कमकुवतच आहे. उद्या बहुचर्चित असलेल्या तासगावमध्ये सभा होऊन राष्ट्रवादीची ही यात्रा साताऱ्याकडे प्रयाण करेल. पण अशा यात्रांचा पक्षाच्या सक्षमीकरणासाठी किती उपयोग होतो याचाही विचार करण्याची वेळ पक्ष नेतृत्वावर आली आहे. 

राष्ट्रवादीतील या जिल्ह्यातील दोन पाटलांचा दरारा राज्यभरात होता. आर. आर. आबा असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा नेता कोण ही स्पर्धा त्यांच्यात आणि जयंतरावांत होती. दोघांतील हा संघर्ष लपून नव्हता पण फार उघडही नव्हता.

पण आबा गेले आणि तत्पूर्वी केंद्र आणि राज्यातील सत्ता गेली. सत्ता असताना कार्यकर्ते सांभाळताना फार अडचण नसते. पण सत्ता नसणाऱ्या काळातच कार्यकर्ते सांभाळणे अवघड असते. याचाच अनुभव राष्ट्रवादी घेते आहे. 

खरे तर जयंतरावांची स्पर्धा जिल्ह्यात पंतगरावांशी असायची पण आता तेसुद्धा हयात नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव अनुभवी व सामर्थ्यवान नेता म्हणजे जयंतराव अशीच स्थिती आहे. अर्थात आता चित्र बदलले आहे. काल-परवाच ज्या संजय पाटलांना जयंतरावांनी राष्ट्रवादीत आणून आपला गट सक्षम केला होता तेच संजयकाका आता भाजपमधून खासदार होऊन जयंतरावांच्या राष्ट्रवादीला आव्हान देत आहेत. 

अजितदादा जे म्हणाले की माजी गृहमंत्र्यांच्या पत्नीवर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यांचा रोख नेमका संजयकाकांसह अन्य कोणाकोणावर आहे, हे जनतेला समजले आहे. अर्थात तासगावची नगरपालिका भाजपने खेचून घेतली आहे.

आता येणाऱ्या विधानसभेला आबांच्या येथील गटाला आपली आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी टोकाची लढाई करावी लागेल हे स्पष्ट आहे. आता सहानुभूती नाही आणि येथे आबा गटासाठी मोठा आधारही कोणी नाही. 

कडेगाव-पलूसमध्ये राष्ट्रवादी म्हणजे फक्‍त अरुण लाड यांचा गट एवढेच आहे. या ठिकाणी पृथ्वीराज देशमुख हे एकेकाळचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत. नुकतेच पतंगरावांचे निधन झाले.

यावेळी एका श्रद्धांजली सभेत जयंत पाटील यांनी पतंगरावांचे पुत्र राज्य युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम यांना भविष्यात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे वचनच देवून टाकले आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी विधानसभेला कॉंग्रेस विरोधात लढणार नाही, असा स्पष्ट संदेशच गेला आहे. 

सांगलीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात वाद नाहीत असा दावा करण्यात येत असला तरी त्यात तथ्य नाही.

त्यांच्यातील वाद कायम आहे. कमलाकर पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी 14 गावांची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या गटाने गावागावात फिरून हल्लाबोल यात्रेसाठी बैठका घेतल्या. मात्र सांगली शहरात तशा बैठका झाल्याचे दिसले नाही.

उलट राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजप, कॉंग्रेसच्या वाटेवर अशाच चर्चा पुन्हा ऐन हल्लाबोल यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाल्या. संजय बजाज यांच्याकडे शहराची जबाबदारी आहे.

त्यांच्याविरोधात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून असंतोष व्यक्त केला. मात्र त्यावर प्रदेशकडून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हल्लाबोल यात्रेकडे नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे अंतर्गत वादाचा प्रश्‍न केवळ सांगलीतच आहे असे नाही. वाळव्यातील नाराजीचा फटका नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला बसला आहे. दिलीप पाटील यांनीही विधान परिषद निवडणुकीवेळी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त इच्छा अजून पूर्ण होत नाही. चिरंजीव संग्राम यांना तरी किमान युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष करावे अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. पण तेही जमत नाही.

इतर तालुक्‍यात दमदार नेते नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुरी आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी जमत नसेल तर पद सोडा असे सांगितले आहे. पण, करायचे काही नाही अन्‌ पदही सोडायचे नाही असेच चित्र दिसत आहे. 

दोन महिन्यांवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक आहे. सध्या राष्ट्रवादी येथे विरोधी पक्ष आहे. एककाळ जयंतरावांनी भाजपसह विविध पक्षांची महाआघाडी करून सत्ता मिळवली होती.

पण यावेळी दोन्ही कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असेच चित्र आहे. तर विभानसभेला गेल्यावेळी राष्ट्रवादीचे येथे डिपॉझिटही वाचलेले नाही. त्यामुळे एककाळ बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान आहे ते पक्षाची ताकद वाढविण्याचे.

अर्थात इस्लामपूर हा एकमेव किल्ला आता तसा सक्षम आहे. येथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत पाटील आणि सदाभाऊंना रसद देवून जयंतरावांना या तालुक्‍यातच अडकवून ठेवले आहे.

अशा स्थितीत हल्लाबोल यात्रेत अजितदादा आणि त्यांच्या टिमने भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला पण पक्ष संघटनेतील तासगावसह विविध ठिकाणी असणाऱ्या प्रश्‍नांवर मात्र कार्यकर्त्यांशी संवाद काय केला, हा सवाल सर्वांना पडला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com