आमदारकी मागत असलेल्या अरुण लाडांना खासदारकीची लॉटरी?

लोकसभा निवडणुकीबाबत माध्यमातून चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मी थेट पक्षाकडे आग्रह धरलेला नाही. पक्षाने संधी दिल्यास काय ते पुढे ठरवू.''-अरूण लाड, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष.
आमदारकी मागत असलेल्या अरुण लाडांना खासदारकीची लॉटरी?

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगर आणि सांगली मतदारसंघाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय संशयकल्लोळ रंगला आहे. नगरच्या जागेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मतभेद उफाळलेत. त्याचवेळी नगरची जागा कॉंग्रेसला आणि सांगलीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे देण्याबाबत आडाखे बांधले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचेच नाव अनपेक्षितपणे पुढे आल्याने या संशयकल्लोळात आणखी भर पडली आहे. 

सांगली लोकसभेच्या जागेसाठी माजी खासदार प्रतीक पाटील, आमदार विश्‍वजित कदम, विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यात चढाओढ आहे. अर्थात विश्‍वजित कदम व विशाल पाटील यांनी यात रस न दाखविल्याने आता कॉंग्रेसकडून ही जागा राष्ट्रवादीकडे द्यावी असे तर्क व्यक्‍त होऊ लागले आहेत. पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनाने सांगलीच्या कॉंग्रेसमध्ये मोठी पोकळी आहे. यामुळे भाजपसमोर तगडा उमेदवार कोण हे शोधायची वेळ कॉंग्रेसवर आली आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीमुळे राष्ट्रवादी नेत्यांचीही मत विचारात घ्यावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभेसाठी तगडा उमेदवार देवू, असे म्हटले असले तरी ते फारसे या मतदारसंघात लक्ष घालत नाहीत असे चित्र आहे.

कॉंग्रेसमध्ये उमेदवारीवरुन सध्या अनिश्‍चितता आहे. या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादी या जागेवर कितपत दावा करेल, हेही अस्पष्ट आहे. आणि असा दावा केलाच तर सांगली लोकसभेसाठी तगडा उमेदवार कोण हेही स्पष्ट करायला हवे. मात्र ज्या लाड यांचे नाव येथे घेतले जात आहेत ते मुळात पदवीधर मतदार संघातून इच्छूक असून तयारी करत आहेत. अशावेळी त्यांचे नाव येथे चर्चेला आणण्यामागे डाव कोणाचा याबाबत तर्क सुरू आहेत. 

नगर लोकसभेसाठी कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. त्याचा आधार घेवून ही चर्चा सुरु झाली आहे. सांगलीतील काही प्रमुख नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. दिल्लीत जावून कॉंग्रेसच्या वरिष्ठांनाही याबाबत परस्थितीची माहिती दिल्याचे कळते. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com