सातारा जिल्हा बॅंक नोकर भरती गोंधळ :चौकशी आदेश झुगारून निकाल जाहीर -आमदार गोरें

satara bank
satara bank

सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकरभरती प्रक्रियेत सावळा गोंधळ असून चुकीच्या पध्दतीने परीक्षा घेतली होती. संचालक मंडळाने संबंधीत एजन्सीशी संगनमत करुन अनेक परिक्षार्थींकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.

या विषयी मुख्यमंत्री आणि सहकार विभागाकडे आपण तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन परिक्षा पध्दतीची चौकशी करण्याचे तसेच तोपर्यंत परिक्षेचा निकाल घोषित न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पण या आदेशाकडे दूर्लक्ष करीत आज बॅंकेच्या व्यवस्थापनाने घाईगडबडीत निकाल जाहीर केला आहे, अशी माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. 


आमदार गोरे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सात जानेवारी रोजी क्‍लार्क आणि शिपाई पदाच्या नोकरभरतीची जाहीरात प्रसिद्ध केली होती. 376 जागांसाठी सुमारे चार हजार परिक्षार्थींनी अर्ज केले होते.

बॅंकेत नोकरभरती होणार असल्याचे समजताच संचालक मंडळाच्या हालचाली वाढल्या होत्या. अनेकांनी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले. हव्या त्या उमेदवारांना परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाने एनआयबीईआर या एजन्सीशी संगनमत केले.

सदर नोकरभरती प्रक्रियेत सावळा गोंधळ झाला आहे. घेण्यात आलेली परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची होती. परिक्षार्थींनी अचूक उत्तराच्या पर्यायाला गोल करायचा होता. मात्र, उत्तर चुकीचे वाटले तर पहिल्या उत्तरावर काट मारुन पुन्हा दुसरे उत्तर निवडण्याची सुविधा देण्यात आली होती.

नोकरभरतीच्या परिक्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडविले गेले. अशा चुकीच्या परिक्षा पध्दतीमुळे सत्ताधारी संचालक मंडळाच्या फेवरमधील उमेदवारांना उत्तीर्ण करण्याचा डाव खेळला गेला आहे. यामुळे खऱ्या पात्र उमेदवारांचे नुकसान झाले आहे.

ही परीक्षा पध्दती चुकीची आणि बेकायदेशीर आहे. ज्या लोकांचे नोकरीसाठी पैसे घेतले त्या लोकांना निवडण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आला होता. 

जिल्हा बॅंकेची परीक्षा पध्दती चुकीची असल्याची आणि खऱ्या पात्र उमेदवारांचे नुकसान होत असल्याबाबतची तक्रार आमदार गोरेंनी मुख्यमंत्री आणि सहकार विभागाकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनीही या तक्रारीची तात्काळ दखल घेत सातारा जिल्हा बॅंकेने  नोकरभरतीसाठी घेतलेल्या परीक्षेची संपूर्ण चौकशीचे तसेच तोपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करु नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सहकार आयुक्त पुणे यांना आज दिले.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करुन शासनाला अहवाल सादर करण्याची सूचना असताना या आदेशाची कुणकुण लागल्यानेच बॅंकेने आज सायंकाळी साडेपाच वाजता घाईगडबडीत निकाल जाहीर केला आहे.

या नोकरभरतीसाठी सत्ताधारी संचालक मंडळाने कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. चुकीच्या पध्दतीने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात येऊन पुढची प्रक्रिया थांबवावी. अन्यथा, या भरतीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार गोरे यांनी दिला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com