शेट्टी हॅटट्रिक करणार? आंबेडकरांच्या पराभवाची मालिका थांबणार? 

शेट्टी हॅटट्रिक करणार? आंबेडकरांच्या पराभवाची मालिका थांबणार? 

पुणे: मोदी सरकारच्या विरोधात देशभर वातावरण तयार करण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. 2019 च्या लोकसभेसाठी कॉंग्रेस नवे मित्रही शोधत असून महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना बरोबर घेण्याच्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. हे दोन्ही नेते कॉंग्रेसबरोबर गेल्यास दोघांची लोकसभेतील वाट सुकर होऊ शकते. 

तीन दिवसांपुर्वीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राजू शेट्टींना त्यांच्या शिरोळ येथील घरी जावून भेटले. गेले काही दिवस पृथ्वीराज चव्हाणांसारखे कॉंग्रेस नेते शेट्टींवर टीका करत होते. यापार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांनी राजू शेट्टींना त्यांच्या घरी जावून भेटण्याला महत्त्व आहे. या भेटीतून आगामी लोकसभेसाठी स्वाभिमानी कॉंग्रेसला साथ देऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत. अर्थात शेट्टी हे कसलेले नेते असल्याने ते आगामी समीकरणांबाबत आताच बोलणार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

अशोक चव्हाण हेच शेट्टींशी संवाद वाढवत आहेत, अशातला भाग नाही. शेट्टींचा राजकीय उदय झाल्यापासू हाडवैर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतेही शेट्टींबाबत अधूनमधून चांगले बोलत असतात. गेल्या आठ-दहा महिन्यांचा काळ शेट्टींसाठी फारच आव्हानात्मक होता. शेट्टींचे पुर्वीचे सहकारी सदाभाऊ खोत यांना भाजपने पुर्णपणे आपलेसे करुन त्यांना शेट्टींविरोधात वापरले. मात्र वेळीच सावध होत शेट्टींनी चलाखपणे पावले उचलली. भाजप सरकारविरोधात पुणे ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा काढली. संघटनेवर मांड बसवली, तसेच जयसिंगपूरची ऊस परिषद यशस्वी करुन पश्‍चिम महाराष्ट्रातील आपले वजन कमी झाले नसल्याचे दाखवून दिले. 

शेट्टी हे भाजप विरोधात लढत असताना, अगदी सुरवातीला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (कागल) यांनी शेट्टींना बळ देणारी भाषा वापरली. आमदार जयंत पाटील (इस्लामपूर) यांनी अप्रत्यक्षपणे शेट्टींना मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे. स्वत: पक्षप्रमुख शरद पवार यांनीही शेट्टींच्या नेतृत्वाला पूरक विधाने केली आहेत. त्यामुळे पुर्वीप्रमाणे राष्ट्रवादी विरोध करणार नाही, हे स्पष्ट आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेट्टी लोकसभेत प्रतिनिधीत्व करत असलेला हातकणंगले मतदारसंघ हा कॉंग्रेसच्या कोट्यातील आहे. आगामी लोकसभेला कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल, अशी चिन्हे आहेत. तसे झाल्यास शेट्टींना ती जागा कॉंग्रेसच्यावतीने सोडण्यात येईल. परिणामी 2009, 2014 नंतर 2019 ला शेट्टी सुलभपणे लोकसभेत जाऊ शकतात. भाजप मात्र शेट्टींना अडविण्यासाठी प्रयत्न करणार हे नक्‍की. 

राजू शेट्टी हे कॉंग्रेसचे मित्र बनण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट बघावी लागेल, मात्र प्रकाश आंबेडकरांचा भारीप बहुजन महासंघ कॉंग्रेस आघाडीत खात्रीपुर्वक असेल, असे म्हणता येऊ शकते. प्रकाश आंबेडकर हे भाजपच्या राजकारणाचे कठोर टीकाकार आहेत. मोदी सरकार आल्यापासून तर ते सातत्याने भाजपवर आक्रमकपणे हल्लाबोल करतात. डाव्या संघटना तर नेहमी आंबेडकरांबरोबर असतात. मध्यंतरी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून आंबेडकरांचे नाव पुढे केल्याची चर्चा होती. डाव्या नेत्यांनी हे नाव घेतले होते, त्याला कॉंग्रेसने पाठिंबा द्यायचा, अशी रणनिती होती. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.

मोदींचा पराभव करण्यासाठी देशभरात कॉंग्रेससह संयुक्‍त आघाडी बनविण्याचा प्रयत्नात आंबेडकर हे प्रमुख नेते आहेत. परिणामी अकोला लोकसभा मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांसाठी सोडला जाऊ शकतो. 1998 ला कॉंग्रेस आणि आरपीआयच्या सर्व गटांची युती झाली असताना आंबेडकर अकोल्यातून निवडून आले होते. मात्र त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 साली झालेल्या निवडणुकांत पराभव झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही अकोल्याची जागा कॉंग्रेसच्या कोट्यातील आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा मार्ग सोप होण्याची शक्‍यता आहे. परिणामी त्यांच्या पराभवाची मालिका खंडित होऊ शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com