मुद्रांक शुल्कावरून भाजप-शिवसेना आमने-सामने

मुद्रांक शुल्कावरून भाजप-शिवसेना आमने-सामने

मुंबई : शिवसेनेला विश्वासात न घेता राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात जी वाढ केली आहे. ती तातडीने मागे घ्यावी. अन्यथा सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज दिला आहे. 

नागरी भागातील स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी पाच टक्के तर ग्रामीण भागासाठी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यासह बक्षिस पत्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयास शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती देण्यासाठी कदम यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. भाजपाने हा निर्णय मागे न घेतल्यास शिवसेना आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

बक्षिसपत्र हे कौटुंबिक मालकीचे असून त्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क लादू नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. या निर्णयामुळे घरातील सर्वावर अन्याय होणार असून रक्ताची नाती तोडण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोप यावेळी कदम यांनी केला. सरकारच्या या निर्णयाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निषेध केला आहे. हा निर्णय मागे घेण्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले आहे. आजच शिवसेनेच्यावतीने याविषयी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार होते. तथापि ते मुंबईबाहेर असल्याने निवेदन देता आले नसल्याचे कदम यांनी शेवटी सांगितले. 

सरकार शिवसेना-भाजपाचे असले तरी धोरणात्मक निर्णय घेताना भाजपा शिवसेनेला विश्‍वासात घेत नसल्याचे सांगून रामदास कदम पुढे म्हणाले की, सरकार एकत्र चालवायचे असेल तर शिवसेनेलाही विश्‍वासात घ्यावेच लागेल. या निर्णयाबाबत बैठकीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री दिवाकर रावते यांनीही कडाडून विरोध केला होता. तथापि या विरोधाला न जुमानता हा ठराव भाजपाने मंजुर केला आहे. भाजपाला सरकार चालविण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. त्यामुळे यापुढे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेला विश्‍वासात घ्यावे, यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. 

मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय गोरगरीबांच्या व मध्यमवर्गियांच्या विरोधात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयास स्थगिती द्यावी अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या निर्णयास स्थगिती न दिल्यास शिवसेना त्याविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com