शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर ? 

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर ? 

ठाणे ः शेतकऱ्यांच्या विषयावर कधीही सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा विरोध कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. 

एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असतानाही हे पद सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे,अशी शिफारस मुख्यमंत्र्यांनी केल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्याकडून सत्तेची पाच वर्षे पूर्ण केली जाणार असल्याचा विश्‍वास वारंवार व्यक्त केला जातो; तर उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला जातो.

आगामी दोन वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून फारकत घेण्याची भूमिका धोकादायक समजली जात आहे. अशा वेळी विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर एखाद्या अस्मितेच्या विषयावरून शिवसेना सरकारमधून बाहेर पडून भाजपच्या विरोधात रान उठविण्याची अटकळ भाजपच्या चाणक्‍यांकडून व्यक्त होत आहे. ती वेळ टाळण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवसेनेला सत्तेत भागीदार करून घेण्यासाठी भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची तजवीज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. 

उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून शिवसेनेला थेट एकनाथ शिंदे यांचे नाव सुचविण्यात आल्याने शिवसेनेत तो चर्चेचा विषय झाला आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या जुन्याजाणत्या नेत्यांकडून मंत्रिपद मिळाल्यानंतर आमदारापासून असलेला दुरावा कायम चर्चेत राहिला आहे. त्या वेळीही किमान ऐकून घेणारा मंत्री म्हणून शिवसेनेच्या आमदारांना शिंदे जवळचे वाटत होते. अशा वेळी विधान परिषदेवरील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी काहींना डच्चू मिळणार होता; पण साऱ्या शक्‍यता बाजूला सारून सर्व ज्येष्ठ मंत्री पदावर कायम राहिले आहेत; पण त्यानंतरही अनेक मंत्र्यांबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये असलेला असंतोष कायम आहे. 

सद्यस्थितीत शिवसेनेकडे सत्तेतील एखादे मोठे पद चालून आल्यास शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. एमआयडीसीमधील एका जमिनीच्या व्यवहारावरून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आरोप झालेले आहेत. अशा वेळी त्यांचे नाव मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याचे मानले जाते.

विरोधी पक्षनेते म्हणून अल्पावधीत आपली छाप पाडण्यात यशस्वी झालेले एकनाथ शिंदे यांच्यासारखा आक्रमक चेहरा आपल्या सोबत असल्यास विरोधकांना उत्तर देणे सोयीचे होईल, हा होरा ठेवून शिंदे यांचे नाव मुख्यमंत्र्यांच्या गोटातून पुढे करण्यात आले आहे; पण या विषयावर उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

त्याचबरोबर त्यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले जाईल की नाही, याबद्दलच साशंकता व्यक्त होत आहे; परंतु सत्तेतील वाढता सहभाग हा संघटनेसाठी पुढील निवडणुकीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा दावा शिवसेनेतील एका गटाकडून केला जात आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणता प्रस्ताव दिला अथवा कोणाचे नाव दिले, याची मला कल्पना नाही. मी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे ज्या विषयाची मला माहितीच नाही, त्यावर मी बोलणे संयुक्तिक ठरणार नाही. माझ्या राजकीय जीवनात पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार काम सुरू ठेवणे, एवढेच माहिती आहे. अशा वेळी सहकारी पक्षाकडून आलेल्या कोणत्याही ऑफरची मला कल्पना नाही. हा विषय पक्षाशी संबंधित असल्याने पक्षप्रमुखच भाष्य करतील. 
- एकनाथ शिंदे, 
सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com