अंबादास दानवेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असे विश्वसनीय वृत्त आहे .
Ambadas_Danve
Ambadas_Danve

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असे विश्वसनीय वृत्त आहे . शनिवारी सकाळी अंबादास दानवे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. १ ऑगस्ट रोजी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दानवे कोणता मुहूर्त साधणार यावर चर्चा सुरू झाली आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना उतरवले जाईल अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र, त्यात नगरसेवक राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. शिवाय मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचेही नाव या चर्चेत होते.

 मात्र, अंबादास दानवे यांच्या नावाची कुठली चर्चा नसताना शिवसेना नेत्यांनी त्यांना उमेदवारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते . कालपासून अंबादास दानवें मुंबईत आहेत. त्यांना पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप अधिकृत पत्र मिळालं नसल्याचं अंबादास दानवे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. तरीही शिवसेनेकडून लवकरच अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा होणार आहे. 

अंबादास दानवे हे गेल्या १६ वर्षांपासून औरंगाबादचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करीत आहेत. २०१३ पासून ते आजपर्यंत जिल्हाप्रमुख म्हणून पद भूषवणारे शिवसेनेतले ते एकमेव नेते असावेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी अंबादास दानवे यांची भूमिका आतापर्यंत महत्त्वाची राहिली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्षामध्ये आपलं स्थान पक्क केले आहे.

अंबादास दानवे यांनी २०१४ मध्ये गंगापूर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांचा भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी पराभव केला होता. शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाल्यानं त्यांचा १३ हजार मतांनी पराभव झाला होता. मधल्या काळात अंबादास दानवे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात मराठा समाज एकवटण्यासाठी प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीसुद्धा स्थानिक शिवसेनेतून सुप्तपणे झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये पाचव्यांदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. स्थानिक शिवसैनिकांची मागणी आणि पक्षांमध्ये असलेलं अंबादास दानवे यांचं वजन अखेर त्यांना विधान परिषद निवडणुकीपर्यंत पोहोचवले आहे.

आज चर्चेत नसलेल्या अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त पसरताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज मुहूर्त पाहून दाखल केला होता. त्यावेळी अंबादास दानवे हेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. उत्तम मुहूर्त पाहूनही शिवसेनेच्या पदरी पराभव पडला होता. तो शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. आता अंबादास दानवे हे कोणत्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com