पालघरमध्ये शिवसेनेने कमावले; कॉंग्रेस, 'बविआ'ने गमावले! 

निवडणूक अचानकपणे लढवण्याचा निर्धार केल्यानंतर शिवसेनेने कमी वेळेत चमकदार परफॉर्मन्स दाखवला आहे. शिवसेनेने उभे केलेले आव्हान 2019 मध्ये त्यांना लाभदायी आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पालघरमध्ये शिवसेनेने कमावले; कॉंग्रेस, 'बविआ'ने गमावले! 

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने अचानकपणे उडी घेऊन पालघर निवडणुकीत रंगत तर आणलीच पण त्याच बरोबर जिल्ह्यात नव्याने राजकीय आव्हान उभे केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्वस्व पणाला लावले असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली आणि भाजपाने ही जागा राखल्याने पक्षाची लाज राखली गेली. 

या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वेगवेगळी विधाने तसेच शिवसेना व भाजपा मधील आरोप-प्रत्यारोप यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली होती. या निवडणुकीमध्ये प्रचारदारम्यामन शिवसेनेने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत होते. असेच चित्र अनेक वृत्तपत्रांनी व वृत्त वाहिन्यांनी दर्शवल्यामुळे निवडणूक भाजपा, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. 

या निवडणुकीत भाजपने शिवसेनेवर 29 हजार 572 मतांनी तर बहुजन विकास आघाडीवर 49 हजार 944 इतक्‍या फरकाने सहज विजय संपादित केला. या निवडणुकीमध्ये भाजपने पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. ही आघाडी सातत्य राखत वाढत नेली. काही फेऱ्यांचा अपवाद वगळता भाजपाने मतमोजणी दरम्यान शिवसेनेवर त्यांनी सतत वर्चस्व ठेवले. 

सध्या पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन, भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक आमदार आहे. मात्र या पोट निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणाला छेद देत शिवसेनेने संपूर्ण मतदारसंघांमध्ये मुसंडी मारल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे. 

2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने कॉंग्रेसच्या उमेदवारांनी 1 लक्ष 60 हजार मते मिळवली होती, तर 2014 चा अभ्यास करता कॉंग्रेस राष्ट्रवादीची ताकद एक लाख मतांच्या जवळपास होती असे दिसून येते. मात्र कॉंग्रेसने या पोट निवडणुकीत जेमतेम 47 हजार मते घेतल्याने या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी शिवसेना तर अन्य ठिकाणी भाजपाचे काम केल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे. 

बहुजन विकास आघाडीने वसई व नालासोपारा या विधानसभा मतदार संघांमध्ये आपले वर्चस्व व मतांची आघाडी कायम राखली असून बोईसर येथे शिवसेनेच्या खालोखाल तीन हजार मतांच्या फरकाने मते मिळवली आहेत. सन 2009 लोकसभा निवडणुकीत बविआने दोन लाख 23 हजार मते मिळाली होती तर 2014 मध्ये या पक्षाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबतीने दोन लाख 93 हजार पर्यंत मजल मारली मारली होती. बविआची डहाणू, विक्रमगड व पालघर येथे झालेली पीछेहाट त्यांचा पराभवाला कारणीभूत ठरलेली असून वसई व नालासोपारा येथे शिवसेना, भाजपा ची वाढलेली ताकद त्यांच्यासाठी चिंतेचे करण झाले आहे. 

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली पारंपारिक मत राखण्यात यश आले असून या पक्षाने 70 ते 90 हजार मतं मिळवण्याची सन 2009 पासूनची परंपरा कायम ठेवली आहे. 

सन 2014 मध्ये वसई वगळता इतर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेने सुमारे दोन लाख मतदार मिळवली होती. शिवसेनेने आपली ताकद वाढवत तसेच श्रीनिवास वनगा यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या सहानुभूतीचा लाभ घेत या निवडणुकीत 40 हजार मत वाढविल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने बोईसरमध्ये आघाडी घेतली तर पालघर विक्रमगड या दोन मतदारसंघ भाजपचा मतांचा जवळ पास येण्याचा यशस्वी प्रयत्न करून दाखवला. डहाणू मतदारसंघात शिवसेनेने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. वसई व नालासोपारा मतदारसंघांमध्ये शिवसेनेची झालेली पीछेहाट हीच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com