सावंत बांधूंना नडला अतिआत्मविश्‍वास; आता पक्षप्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष 

सोलापूर जिल्ह्यात चांगले वातावरण असलेल्या शिवसेनेला संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांचा अतिआत्मविश्‍वास नडला आहे. उमेदवारी वाटपातील चुकीच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता संपर्क प्रमुख, समन्वयक आणि जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.
Pandharpur Tanaji Sawant
Pandharpur Tanaji Sawant

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात चांगले वातावरण असलेल्या शिवसेनेला संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांचा अतिआत्मविश्‍वास नडला आहे. उमेदवारी वाटपातील चुकीच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता संपर्क प्रमुख, समन्वयक आणि जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. 

करमाळ्यात विद्यमान आमदार नारायण पाटील यांना टाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या रश्‍मी बागल यांना संधी देण्यात आली. उमेदवारीसाठी नारायणआबांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले. उमेदवारी नाकारून एकप्रकारे सावंत यांनी त्यांचा अपमान केल्याचे दिसून आले होते. निवडणूकीपूर्वी नारायणआबांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. बंडखोरी केलेल्या नारायणआबांना पाठींबा दिल्याच्या कारणावरून करमाळ्यातील उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करणार असल्याचे नारायण आबांनी हुतात्मा स्मृती मंदिरातील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते. दुपारपर्यंत नारायणआबाच विजयी होतील असे चित्र होते. पाटील आणि बागल यांना मागे टाकून या ठिकाणाहून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अपक्ष उमेदवार संजय शिंदे हे विजयी झाले आहेत. 

शहर मध्य विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून आला असता असे चित्र होते. जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी जोरदार तयारी केली होती, पण ऐनवेळी दिलीप माने यांना उमेदवारी देऊन सावंत यांनी गोंधळ वाढविला. कोठे यांनी प्रणिती शिंदे यांना चांगलेच हैराण केल्याचे दिसून आले. कोठे तिसऱ्या क्रमांकावर तर माने चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. माने यांचा हा मतदार संघच नव्हता. दावेदारी नसतानाही त्यांना उमेदवारी दिली गेली होती. कोठे समर्थकांनी आता सावंत हटाव मोहीम हाती घेतली आहे. 

सांगोल्यात सकाळपासूनच शिवसेनेचे शहाजी पाटील आणि शेकापाचे अनिकेत देशमुख यांच्यात लढत झाली. शेवटी शहाजीबापू पाटील यांनी विजयश्री मिळविली. मला एकदा तरी शिवसेनेचा आमदार म्हणून काम करायचं आहे, असे त्यांनी सोलापुरात झालेल्या मेळाव्यात सांगितले होते. त्यांचा हा विजय वैयक्तीक ताकदीवर असल्याचे बोलले जात आहे. बार्शीत राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांना धक्का बसला आहे. त्याठिकाणी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंधळकर हे शिवसेनेकडून इच्छुक होते. 

मनोज शेजवाल यांनी मोहोळमधील अनेक गावात संपर्क वाढविला होता. त्यांचा पत्ता कट करून तिथे नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी दिली गेली. क्षीरसांगर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. सावंत यांनी सुचवलेले माढ्यातील संजय कोकाटे यांचाही पराभव झाला. करमाळा आणि मध्य विधानसभा मतदार संघात काय निकाल लागतो याकडे सर्वांच्या लक्ष लागले होते. या दोन्ही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी चांगलीच टक्कर दिली. जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांना प्रा. तानाजी सावंत यांनी स्वत: उमेदवारी वाटप केल्या होत्या. शिवसेनेकडून उमेदवारांची निवड चुकली, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com