"सनातन'ने आणले दोन चव्हाणांना एकत्र

"सनातन'ने आणले दोन चव्हाणांना एकत्र

पुणे : पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांत फारसे सख्य नाही, हे काॅंग्रेसमधील उघड सत्य आहे. काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले अशोक चव्हाण यांनीही दुसऱ्या चव्हाणांना आपल्या कारभारात फारसा हस्तक्षेप करू दिला नाही. हस्तक्षेप लांबच पण पृथ्वीराज चव्हाण यांना फारसे स्थान मिळणार नाही, याचीही काळजी अशोकरावांच्या गटाने घेतली. मात्र सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी या दोघांनी आज पुण्यात एकाच व्यासपीठावर केली.

दोन्ही चव्हाण एकाच वेळी एकाच पत्रकार परिषदेत पुण्यातील काॅंग्रेस भवनात बऱ्याच वर्षांनी दिसले. दोघेही या विषयावर सविस्तर बोलले. त्यामुळे सनानतने या दोघांना एकत्र आणले, अशी चर्चा कार्यकर्त्यांत होऊ लागली. मुंबईत ते विविध कार्यक्रमांत, पक्षाच्या बैठकीत एकत्र असतात. मुंबईबाहेर मात्र एकत्रित अशी उपस्थित अभावाने असते.

काॅंग्रेसमध्ये गट-तट नवीन नाहीत. सत्ता गेल्यानंतर ते कमी होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळेच पृथ्वीराजबाबा व अशोकराव यांचे फारसे एकत्रित कार्यक्रम झाले नाहीत. दोघांनीही आपले सवतेसुभे कायम ठेवले. असे असले तरी दोघांनीही एकमेकांविरोधात जाहीर वक्तव्ये किंवा उघडपणे शह-कटशह असे राजकारण केले नाही. तरी दोघांतील दुरावा हा कार्यकर्त्यांना दिसून येत होता. 

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण अडकले होते. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले पृथ्वीराज चव्हाण यांनी यात फारसे सहकार्य केले नाही. उलट अधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशा आक्षेप चव्हाण समर्थकांचा होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मी आदर्श प्रकरणी कारवाई केली असती तर तीन माजी मुख्यमंत्री अडचणीत आले असते, पृथ्वीराज चव्हणा यांनी विधान केले होते. तेव्हापासून हा वाद आणखी वाढला होता. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पृथ्वीराज यांना संघटनेत फारशी जबाबदारी राहणार नाही, याची काळजी घेतली. 

आता मात्र दोघांना परिस्थितीची जाणीव झाली असल्याने किंवा पश्चिम महाराष्ट्रात काॅंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होत असल्याने दोघांनीही पुण्यात एकत्रित पत्रकार परिषदेस संबोधित केले. दोघांनीही सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्यांप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले आहेत. त्यामुळे सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा त्यांनी आग्रह धरला.

31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा 
""केंद्र व राज्य सरकारची थापेबाजी, खोटी आश्‍वासने आणि जाहिरातबाजीचा पर्दाफाश करण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील श्री तीर्थक्षेत्र अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन 31 ऑगस्ट रोजी या यात्रेला प्रारंभ होईल व सात किंवा आठ सप्टेंबर रोजी पुण्यात समारोप होईल,'' अशी माहिती अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com