'गुजरात में फटी, तो जीएसटी घटी': उद्धव ठाकरे 

'गुजरात में फटी, तो जीएसटी घटी': उद्धव ठाकरे 

मुंबई : अर्थात "जीएसटी'मधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोट्या व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे. "गुजरात में फटी तो जीएसटी घटी' असे जे आता गमतीने बोलले जात आहे. त्यात चुकीचे काहीच नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केली आहे. 

शिवसेनेच्या मुखपत्रात ठाकरे म्हणतात "" लोकक्षोभापुढे सरकार झुकले. 28 टक्‍क्‍यांचा सर्वात उच्च जीएसटी दर असलेल्या 177 वस्तू त्या गटातून काढून 18 टक्के जीएसटी असलेल्या गटात सामील करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ढोल सत्ताधारी पक्षातर्फे वाजविले जात आहेत. कोणत्याही विषयात राजकीय लाभ व प्रसिद्धी कशी मिळवायची यात ही सर्व मंडळी आघाडीवर आहेत.

किंबहुना साखरपुड्यालाच पाळणा आणून बारशाचे सोपस्कार आटोपून स्वतःच्या कर्तृत्वाचे पेढे वाटावेत ते या मंडळींनीच. सरकार या प्रश्नी झुकणारच नव्हते. लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध गेला उडत असे सांगणारे सरकार इतके नरमले कसे ? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात निवडणूक.'' 

हा देश जितका अंबानी-अदानीचा आहे तितकाच तो छोट्या व्यापाऱ्यांचा आहे, असे सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, " जीएसटीने गरीब जनता व लहान, मध्यम व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आणि हे बरोबर नाही. देशात संताप उसळला, पण गुजरातेत लहान व्यापारी रस्त्यांवर उतरला. त्याने लाठ्या खाल्ल्या. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसेल व पंतप्रधानांच्या - सभाही कामी येणार नाहीत, पैशांचा पाऊस पाडूनही मतांची रोपटी उगवणार नाहीत या भयानेच जीएसटीप्रकरणी सरकार झुकले आहे, असल्याचा दावाही ठाकरे यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com