अशोक चव्हाण यांच्या गादीला विदर्भातून सुरूंग? 

महाराष्ट्रातील विविध निवडणुकांत काॅंग्रेसची सातत्याने पिछेहाट होत असल्याने नेत्यांना चिंता वाटत आहे. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याची मागणी प्रामुख्याने विदर्भातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यातून पक्षात आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अशोक चव्हाण यांच्या गादीला विदर्भातून सुरूंग? 

पुणे : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाची राज्यात पिछेहाट होत असल्याची तक्रार आता त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी सुरू केली आहे. यासाठी विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्याकडे चव्हाण यांना हटविण्याची मागणी केली. राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्या कामकाजाबाबतही तक्रारी करण्यात आल्या. 

माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांच्या गटातील नेत्यांनी या भेटी घेतल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, रोहिदास पाटील आदींचे समर्थकही यात असल्याची चर्चा आहे. सातत्याने पराभव होत असूनही मोहनप्रकाश यांना या पदावर का ठेवले, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित करण्यात आला. 

लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांच्याकडील प्रदेशाध्यपदाची धुरा खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली. लोकसभेत महाराष्ट्रातून कॉंग्रेसतर्फे जे दोन खासदार दिल्लीत गेले त्यापैकी एक चव्हाण आहेत. तसेच, गांधी घराण्यावर निष्ठा असलेल्यांपैकीही ते एक आहेत. 

महाराष्ट्रात कॉंग्रेसचा ढासळलेल्या बालेकिल्ला चव्हाण यांच्या निवडीमुळे सावरला जाईल. तसेच, राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला बरे दिवस येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात उलटेच झाले. सर्वच निवडणुकांत पक्षाची निचांकी कामगिरी होत आहे. त्यामुळे त्यांना बदलण्यासाठी पक्षातील त्यांच्या विरोधकांनी आता थेट हायकमांडला साकडे घातले आहे. 

चव्हाण यांना प्रदेशाध्यपदावरून दूर करण्यासाठी त्यांच्या तक्रारींचा पाढा पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर वाचण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने कॉंग्रेसचे नेत्यांनी दिल्लीवारी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. चव्हाण यांच्या कामाची पद्धत ही सरंजामी आहे. त्यांच्या निकवटवर्तीयांचा फायदा त्यातून होतो पण, कॉंग्रेसच पक्षाच्या बांधणीला त्याला हरताळ फासला जात असल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. 

चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केल्यानंतर त्यांच्या जागी कोण, या प्रश्‍नाचे ठोस उत्तर मात्र मिळू शकले नसल्याने चव्हाण सध्या निश्‍चिंत असल्याचे बोलण्यात येते. शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले नारायण राणे असो की संजय निरुपम यांच्यामुळे राज्यातील कॉंग्रेसला कोणतेच बळ मिळले नाही. त्यामुळे चव्हाण यांचा उत्तराधिकारी मुळ कॉंग्रेसच्या मुशीत तयार झालेला असावा, यावर मात्र या नेत्यांचे एकमत झाल्याचे समजते.

त्यातही तो मराठा असावा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेले चक्रव्यूह भेदणारा ब्राम्ह्मण असावा, यावर या मतभेद असल्याचे निरीक्षण एका नेत्याने नोंदविले. विदर्भ हा एके काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्या तेथे पक्षाची नामोनिशाणी शिल्लक आहे की नाही, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे विदर्भासाठी कॉंग्रेसने स्वतंत्र प्रदेश संघटना मंजूर करावी, अशीही मागणी विदर्भातील नेत्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com