ठाण्यात शिवसेनेचा दरारा कमी झाला? आता जयस्वाल पॅटर्नचीच गरज?

सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण करणारी घटना बुधवारी रात्री ठाणे येथे घडली असून, एका 23 वर्षीय तरुणींचा विनयभंग करुन तिला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे ठाण्यात आता महिला सुरक्षेचे उणे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिक्षाचालकाच्या या संतापजनक प्रकारामुळे दोन महिन्यापुर्वी ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुजोर रिक्षाचालकाला चोप देऊन त्याला अद्दल घडविली होती, ती कारवाई योग्य होती असे आता ठाणेकरांना वाटू लागले आहे.
ठाण्यात शिवसेनेचा दरारा कमी झाला? आता जयस्वाल पॅटर्नचीच गरज?

मुंबई : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख धर्मवीर दिवंगत आनंद दिघे यांच्याकाळापासून ठाणे शहरात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी दाखवत नसे. दिघेच्या तालमीत तयार झालेल्या ठाण्यातील शिवसैनिकांनी गेले अनेक वर्षे तो दरारा कायम ठेवला होता. मात्र, अलिकडे मराठीबहुल ठाण्यात आता तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण करणारी घटना बुधवारी रात्री ठाणे येथे घडली असून, एका 23 वर्षीय तरुणींचा विनयभंग करुन तिला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे ठाण्यात आता महिला सुरक्षेचे उणे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रिक्षाचालकाच्या या संतापजनक प्रकारामुळे दोन महिन्यापुर्वी ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुजोर रिक्षाचालकाला चोप देऊन त्याला अद्दल घडविली होती, ती  कारवाई योग्य होती असे आता ठाणेकरांना वाटू लागले आहे. 

ठाणे महापालिकेतील उपायुक्त संदीप माळवी यांनी फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईच्या वेळी रिक्षा चालकांनी मुजोरगिरी केली होती. सरकारी  कामात हस्तक्षेप  करण्याचा  प्रकार  रिक्षा चालकाने केले होता.  त्याला  जशास तसे उत्तर द्यायचे असा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी घेतला. स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमणविरोधी कारवाईत अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकाची कॉलर पकडून त्याला  चांगलेच  बदडवून काढले होते.   ठाण्याची वाहतूक शिस्त बिगडविणाऱ्या रिक्षा चालकांवर जोरदार कारवाईची मोहीम घेतल्याने रिक्षा चालकामध्ये धाक निर्माण करण्याचे काम काही प्रमाणात जयस्वाल यांनी केल्याचे बोलले जाते.

'मी आज आहे उद्या नसेल परंतु ठाणे शहर तुमचेच आहे' असे जनतेला भावनिक आवाहन  करणाऱ्या  संजीव जयस्वाल यांनी ठाण्यातील अनेक अनधिकृत  बांधकामाबरोबर  कुंटणखाने चालविणाऱया इमारत उद्धवस्त केल्या होत्या. ठाणेकर जनतेने जयस्वाल यांच्याबाजूने कौल दिला होता.  मात्र  रिक्षा चालकाला रस्त्यावर उतरुन धडा शिकविण्याचे धाडस केल्यानंतर काही मानवी हक्कवाल्यांनी जयस्वाल यांच्याविरोधात मोहिम सुरु केली  होती. काहीजण न्यायालयात ही गेले होते. आता हे मानवी हक्कवाले तरुणीच्या  विनयभंगाच्या घटनेनंतर कुठे गेले? अशी चर्चाही ठाण्यात ऐकू येत आहे.

रात्रीअपरात्री ज्या शहरात महिला सुरक्षितपणे घरी परतू शकतात, ते शहर सुरक्षित मानले जाते. मुंबई शहराला लागून असलेल्या वाढत्या लोकसंख्येच्या ठाणे शहरातही यापुर्वी महिला सुरक्षितेबाबत एवढी चिंता नव्हती. विशेष म्हणजे रेल्वेस्थानकापासून घरापर्यंत घेवून जाणाऱ्या रिक्षाचालकांवर विश्‍वास ठेवून एखादी तरुणी बिनधास्तपणे एकटी रिक्षात बसण्याचे धाडस करत होती. परंतु, ठाणे  येथे घडलेल्या प्रकारामुळे रिक्षाचालकांच्या विश्‍वासालाही तडा गेला आहे. यापूर्वी रत्नागिरीहून परिक्षेसाठी ठाण्यात आलेल्या मुलीवर रिक्षाचालकांकडून अतिप्रसंग करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली असली तरी रिक्षाचालकांमधील मुजोरीपणा आणि गैरकृत्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
 
मध्यरात्रीपर्यंत गजबजलेल्या तीन हात नाका परिसरातून रात्री साडेनऊच्या सुमारास शेअर रिक्षात बसलेल्या 23 वर्षीय तरुणीला आधीच रिक्षामध्ये बसलेल्या तरुणाने छेडछाड  करण्याचा प्रयत्न केला. मुलुंड येथे न्युट्रिशिअनचे काम करणाऱ्या या तरुणीने आरडाओरडा केला असता तिला पोखरण रोडवर धावत्या रिक्षातून ढकलून देण्यात आले. या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार केली असून संशयित आरोपीचे रेखाचित्रेही जारी केले आहे. मात्र या घटनेमुळे ठाण्यातील महिलांची सुरक्षा आणि पोलिसांचा धाक यावरही प्रश्‍नचिंन्ह निर्माण झाले आहे. 

मुंबईतील मराठीवस्ती हळूहळू कमी झाली. ठाण्याच्या वाढत्या शहरीकरणात मुंबईकर मराठी कुटुंबे ही ठाणेकर झाली. त्यामुळे आनंद दिघे यांचा वारसा सांगत ठाण्यात शिवसेनेचे वर्चस्व टिकविण्यात सेनेचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना यश लाभले आहे. मात्र, रिक्षाचालकांच्या मुजोरी वागण्यामुळे एकेकाळचा ठाण्यातील शिवसेनेचा दरारा कमी झाला आहे का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांनी पिडित तरुणींची विचारपूस केली असून, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. परंतु, शिवसेनेचा दरारा असलेल्या मुंबई ठाण्यात पूर्वी मुलींची छेडछाड करण्याचे कृत्य करण्यास सहजा कोणी धजावत नव्हते. मुजोर रिक्षाचालकांना शिवसेना वठणीवर आणेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 
ठाणे शहरात सुमारे 50 हजार रिक्षाचालक आहेत. परंतु, रिक्षाचालकदादाच्या भरवशांवर एकटेदुकटे मुलीला आता पाठविणे जोखमीचे झाले आहे, अशी भावना ठाणेकरांमध्ये निर्माण झाली आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तसेच परप्रातांतून आलेल्या तरुणांच्या हातात रिक्षा व्यवसाय गेल्याने, ही परिस्थिती आली आहे का? अशी चर्चाही आता ठाण्यात ऐकू येवू लागली आहे. त्यात रिक्षा व्यवसायात महिला रिक्षाचालकांनी प्रवेश करुन धाडस दाखविले. पण या ठाण्यातील शेकडो महिला रिक्षा चालकांनाही आता ताज्या घटनेमुळे धसका घेतला  आहे. 'आमच्या रिक्षामध्ये दारुडे, गुंड प्रवासी बसले तर आम्ही काय करावे' असा सवाल या महिला रिक्षाचालकांना आता पडला आहे. तसेच पुरुष रिक्षाचालक छेडछाड करतात अशी तक्रार ही महिला रिक्षाचालकांनी यापूर्वी केली आहे.  त्यासंदर्भात वाहतुक पोलिसांना निवेदन दिले असून, पोलिस ठाण्याशी जोडणारी जीपीएस सिस्टीम रिक्षांमध्ये कार्यान्वित करावी, अशी मागणी या महिला रिक्षा चालकांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com