पवारांनी सांगितला आपल्या पहिल्या निवडणुकीतील प्रचाराचा अनुभव!

पवारांनी सांगितला आपल्या पहिल्या निवडणुकीतील प्रचाराचा अनुभव!

बारामती : जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा दौरा करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीला पोचल्यानंतर शारदानगरमध्ये राज्यभरातील प्रयोगशील शेतकरी आलेत याची माहिती मिळताच त्यांनी पूर्वनियोजित उरुळी कांचनचा दौरा काही वेळ लांबणीवर टाकून या शेतकऱ्यांची भेट घेतली, तेव्हा अनपेक्षित रित्या पवारसाहेबांना अचानकच पाहिल्यानंतर अप्पासाहेब पवार सभागृहात फक्त मोबाईल कॅमेऱ्यांचा फ्लॅश काही काळ उडत होता...आणि बळीपुत्रांचे चेहरे आनंदून गेले होते!

दुष्काळी दौऱ्यानिमित्त आलेल्या पवार यांनी गाडी वळवून शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी काही काळ संवाद साधत या शेतकऱ्यांना जुन्या काळात नेले. या संवादादरम्यान पवार यांनी `तुम्ही शेतीत यशस्वी झाला आहात, तर ते यश इतरांनाही सांगा, म्हणजे तुमच्या भोवताली देखील राहणीमान व जीवनशैली सुधारेल` असे सांगत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

पवार म्हणाले,` मी जेव्हा सन 1967 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली, तेव्हा निवडणूक आजच्या पेक्षा खूप सोपी होती. प्रचारासाठी कोणाच्या घरी गेल्यास त्यावेळी परातीमध्ये चहा दिला जायचा. मी एकदा तोंड फिरवल्यानंतर तुम्ही चहा पित नाही, तर आमची कामे कसली करणार? असा प्रश्न केल्याने मी चहा पिलो. मात्र पुन्हा पाच वर्षांनी त्याच घरी गेलो, तेव्हा तिथे परातीच्या जागेवर कपबशी आली होती. फक्त कपाचा दांडा तुटलेला होता. पुढे पंधरा वर्षानंतर त्याच घरांमध्ये मी परत जेव्हा गेलो, तेव्हा घोंगडी सतरंजीची जागा चांगल्या खुर्च्यांनी व नंतर ती सोफ्याने घेतली होती. हा राहणीमानातला फरक शेतीतील सुधारणा, त्य़ासाठीचे यशस्वी प्रयोग व घरात शिकलेल्या मुली आल्याने घडला.``

 
पवार यांनी बारामतीच्या जुन्या काळातील एक किस्सा यावेळी सांगितला. ते म्हणाले,` आम्ही सुरवातीस दुधावर काम केले. दुध उत्पादन वाढल्यानंतर दुध संघ काढले. दुध संघ कमी पडले, त्यावेळी डायनामिक्स सारखा उद्योग आणला. आज सोनाई सारखे कित्येक खासगी प्रकल्प सुरू आहेत. डायनामिक्समध्ये तेव्हा 12 लाख लिटर दररोज प्रक्रिया होऊ लागली. येथील ट्रॉपिकाना ज्यूस आज जगात जातो. मात्र गंमत अशी की, दुध जास्त झाल्यानंतर दुधाची पावडर बनवली जाऊ लागली, तीही जास्त होऊ लागली.``

``त्याच काळात मी एकदा इटलीतून येत होतो. विमानतळावर मला एक चॉकलेट मिळाली. तिची माहिती घेतल्यानंतर त्या कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला दुधाची पावडर लागते अशी माहिती देताच त्यांना पावडर दिली तर कारखाना उभारणार का अशी विचारणा केली आणि नंतर येथे चॉकलेटचा कारखाना उभा राहीला. पावडरही खपली, अधिक दुधाचा विषय मार्गी लागला. आज जगाच्या कानाकोपऱ्यात येथील चॉकलेट विकली जाते. खरेतर सुरवात दुधापासून झाली, मात्र त्याच्या प्रक्रिया मूल्यामुळे येथे वेगवेगळे उद्योग उभे राहीले आणि त्यातून लोकांचे जीवनमान उंचावले. जीवनशैली बदलली. ही जीवनशैली सामूहिक यशातून बदलता येते. म्हणूनच तुम्ही शेतकरी यशस्वी आहात, तुम्हीच इतरांचे जीवन बदलू शकता. खरेतर आज लोकसंख्या वाढत असताना शेतीवरील बोजा वाढत चालला आहे. विकास, औद्योगिकीकरण व शहरीकरणामध्ये शेतीखालचीच जमीन गेली आहे, शेतीवरील अवलंबित्व वाढताना जमीन मात्र कमी होत असल्याने शेतीचे अर्थकारण बदलावे लागेल, सुधारणा कराव्या लागतील व बदल करताना सर्वांनी सामूहिक पध्दतीने करावे लागतील,``असा अनुभव त्यांनी सांगितला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com